
Pakistan Khyber Pakhtunkhwa : पाकिस्तानमधून एक मोठी घटना समोर येत आहे. डॉन वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, खैबर पख्तूनख्वा भागात शनिवारी क्रिकेटचा सामना सुरू होता. दोन्ही संघाचे समर्थक घोषणा देत होते. षटकार ठोकल्यावर, फलंदाज बाद झाल्यावर जल्लोष सुरू होताच. दरम्यान त्याचवेळी मैदानात भीषण स्फोट झाला. प्रेक्षक मिळेल त्या रस्त्याने धावत सुटले. यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर इतर प्रेक्षक जखमी झाले. त्यांना उपचारांसाठी जवळच्याच रुग्णालयात भरती करण्यात आले. जखमींपैकी काहींची स्थिती नाजूक असल्याची माहिती समोर येत आहे. हा बॉम्बस्फोट कोणी आणि का घडवून आणला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण खेळाच्या मैदानात झालेल्या स्फोटाने सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
कौसर मैदान बॉम्बस्फोटाने हादरले
डॉन वृत्तपत्राने याविषयीचे वृत्त प्रसिद्ध केले. त्यानुसार, खैबर पख्तूनख्वा प्रदेशातील बाजौर जिल्ह्यात ही घटना घडली. खार तहसीलअंतर्गत कौसर क्रिकेट मैदान आहे. येथे स्थानिक संघ क्रिकेट खेळायला येतात. शनिवार आणि रविवार सुट्टीच्या दिवशी येथे क्रिकेट सामने आयोजित करण्यात आले होते. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या ठिकाणी याच सामन्यात बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट रचण्यात आल्याचे पोलिसांच्या तपासाता समोर आले आहे. इम्प्रोवाईज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईसच्या (IED) माध्यमातून लक्ष्य निश्चित करून हा हल्ला केल्याचे जिल्हा पोलीस अधिक्षक वकास रफीक यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जखमी
या हल्ल्यात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. तर इतर अनेक प्रेक्षक गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. त्यातील काहींची परिस्थिती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. हा हल्ला कोणी आणि का केला याचा खुलासा अद्याप होऊ शकला नाही. हा भाग अफगाणिस्तानशी जोडलेला असल्याने तालिबान समर्थित दहशतवादी गटाचे हे कृत्य असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. पोलीस याप्रकरणी तपास करत आहे. पण हल्ल्याचे उद्दिष्ट लोकांना लक्ष्य करणे हेच असल्याचे तपासात समोर आले आहे.
पोलीस स्टेशनवर पण हल्ला
पोलिसांनी सांगितले की, मैदानात हल्ला केल्यानंतर दहशतवाद्यांनी परिसरातील एका पोलीस ठाण्याला पण लक्ष्य केले. या स्टेशनवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकले. पण त्यांचा निशाणा चुकल्याने ग्रेनेड दुसरीकडे फुटले. त्यामुळे पोलीस ठाण्याचे मोठे नुकसान झाले नाही. अद्याप कोणत्याही दहशतवादी गटाने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही.