
PAK vs AUS 1st T20I: टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी पाकिस्तानने आपल्या तयारीची ताकद दाखवून दिली. टी20 मालिकेतील पहिल्याच सामन्यात पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाला 22 धावांनी पराभूत केलं. यामुळे पाकिस्तानचा आत्मविश्वास नक्कीच वाढला असणार यात काही शंका नाही. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लाहोरच्या गद्दाफी स्टेडियममध्ये पहिला टी20 सामना पार पडला. पाकिस्तानने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 गडी गमवून 168 धावा केल्या. तसेच विजयासाठी 169 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान काही ऑस्ट्रेलियाला गाठता आलं नाही. ऑस्ट्रेलियाने 20 षटकात 8 गडी गमवून 146 धावा केल्या. हा सामना ऑस्ट्रेलियाने 22 धावांनी जिंकला. पाकिस्तानी गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी अक्षरश: नांगी टाकली.
पाकिस्तानने विजयासाठी दिलेल्या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरूवात निराशाजनक झाली. मॅथू शॉर्टच्या रूपाने पहिला धक्का बसला. त्याला फक्त 5 धावा करता आल्या. त्यानंतर ट्रेव्हिस हेड 23 धावा करून बाद झाला. सलामीची जोडी तंबूत परतल्यानंतर एका पाठोपाठ एक रांग लागली. कॅमरून ग्रीनने त्यातल्या त्यात 36 धावा केल्या. तर तळाशी आलेल्या झेव्हियर बार्टलेटने 34 धावांची खेळी केली. या व्यतिरिक्त एकही फलंदाज 20 धावांचा आकडा गाठू शकला नाही. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदी आणि सलमान मिर्झा वगळता सर्वच गोलंदाजांना विकेट मिळाल्या. शाहीन आफ्रिदीने 3 षटकात 29 धावा दिल्या आणि एकही विकेट मिळाला नाही. तर सइम आयुबने 2, अबरार अहमदने 2, शादाब खानने 1 आणि मोहम्मद नवाजने 1 विकेट घेतली.
पाकिस्तानचा कर्णधार सलमान आघा म्हणाला की, आम्ही फलंदाजी करताना चांगली सुरुवात केली. आम्हाला हवा तेवढी धावसंख्या करता आली नाही पण ते आव्हानात्मक होते. 10 षटकांनंतर चेंडू बॅटवर येत नव्हता. मी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेन. आम्हाला खूप फिरकीचा सामना करावा लागेल आणि मला वाटते की मी पॉवरप्लेमध्ये फिरकीवर वर्चस्व गाजवू शकतो. मला वाटले की 170 धावा पुरेशा आहेत. आम्ही जिथे होतो तिथून 10-15 धावा काढू शकलो असतो. प्रामाणिकपणे सांगायचे तर, अबरार त्याच्या पदार्पणापासूनच उत्कृष्ट कामगिरी करत आहे. आमचे फिरकीपटू आमच्यासाठी खरोखर चांगले काम करत आहेत.