
आशिया कप स्पर्धेत पाकिस्तानची कामगिरी एकदम सुमार राहिली आहे. भारतीय संघाने तर त्यांना डोकंच वर काढू दिलं नाही. त्यात हँडशेक न करता त्यांची काय लायकी आहे ते देखील दाखवून दिलं. त्यामुळे पाकिस्तानची मान शरमेने झुकली आहे. असं असताना काहीतरी करावं म्हणून प्रकरण सामनाधिकारी अँडी पायक्ऱॉफ्ट यांच्यावर शेकवण्याचा प्रयत्न केला. जर ते पुढच्या सामन्यात सामनाधिकारी असतील तर खेळणार नाही असा कांगावा वगैरे केला. पण आयसीसीच्या एका निर्णयाने पाकिस्तानची नाचक्की झाली आहे. कारण आयसीसीने पीसीबीच्या तक्रारीला केराची टोपली दाखवली आहे. त्यामुळे पाकिस्तान जागतिक पातळीवर मान आणखी झुकली आहे. त्यामुळे आता काय करावं आणि काय नको अशी स्थिती पाकिस्तानची झाली आहे. धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशा दुहेरी कात्रीत पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि संघ सापडला आहे. त्यामुळे 17 सप्टेंबरला होणाऱ्या सामन्यापूर्वी पाकिस्तानने पत्रकार परिषद रद्द केली.
पाकिस्तान आणि युएई यांच्यातील तिसरा आणि शेवटचा सामना 17 सप्टेंबरला होत आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. कारण विजयी संघाला थेट सुपर 4 फेरीचं तिकीट मिळणार आहे. अशा स्थितीत सामना खेळायचा की बहिष्कार करायाचा असा प्रश्न आहे. कारण या सामन्यात सामनधिकाऱ्याची भूमिका अँडी पायक्रॉफ्टच बजावणार आहेत. दुबईतील आयसीसी क्रिकेट अकादमीमध्ये सराव सत्रापूर्वी पाकिस्तान संघातील एक सदस्य मीडियाला सामोरे जाणार होता. पण पत्रकार परिषद रद्द करण्यात आली. पीटीआयमधील वृत्तानुसार, संघातील सूत्रांनी सांगितले की, सामन्यावर बहिष्काराच्या धमकीवरील प्रश्न टाळण्यासाठी असे करण्यात आले.
दुसरीकडे, या सामन्यावर बहिष्कार टाकणं पाकिस्तानला परवडणारं नाही. कारण यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मोठा भुर्दंड भरावा लागू शकतो. त्यात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची आर्थिक स्थिती नाजूक आहे. त्यामुळे असं करणं महागात पडू शकतं. त्यामुळे आता पीसीबी ताकही फुंकून पित आहे. तोंडावर पडल्यानंतर आता पाकिस्तान संघ मूग गिळून युएईविरुद्धचा सामना खेळेल हे स्पष्ट दिसत आहे. पाकिस्तानने हा सामना गमावला आणखी लाज जाईल. जिंकला तर सुपर 4 फेरीत पुन्हा एकदा भारताचा सामना करावा लागेल. त्यामुळे पाकिस्तानी संघ कोंडीत सापडला आहे.