
आशिया कप 2025 आधी टीम इंडिया सध्या निवांत आहे. भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यानंतर आता थेट आशिया कप स्पर्धेसाठी मैदानात उतरणार आहे. तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तान क्रिकेट संघ सातत्याने अनेक मालिका खेळत आहे. विंडीजने पाकिस्तानचा 2-1 ने धुव्वा उडवत वनडे सीरिज जिंकली. पाकिस्तान अशाप्रकारे विंडीज दौऱ्याचा शेवट गोड करण्यात अपयशी ठरली. त्यानंतर आता पाकिस्तान शारजाहमध्ये जाणार आहे. शारजाहमध्ये पाकिस्तान 2 संघांविरुद्ध भिडणार आहे. या त्रिकोणी मालिकेबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
आशिया कपआधी पाकिस्तान, यूएई आणि अफगाणिस्तान तिन्ही संघांमध्ये टी 20i मालिका खेळवण्यात येणार आहे. या तिन्ही संघांसाठी आशिया कपच्या दृष्टीने ही मालिका फार महत्त्वाची आहे. या ट्राय सीरिजला 29 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. पाकिस्तान या मालिकेतील आपला पहिला सामना 29 ऑगस्टला अफगाणिस्तान विरुद्ध खेळणार आहे. त्यानतंर पाकिस्तान 30 ऑगस्टला यजमान यूएई विरुद्ध भिडणार आहे.
पाकिस्तान यूएईनंतर 2 सप्टेंबरला अफगाणिस्तान विरुद्ध 2 हात करणार आहे. तर 4 सप्टेंबरला पाकिस्तान विरुद्ध यूएई पुन्हा आमनेसामने असणार आहेत. पाकिस्तानचा हा साखळी फेरीतील शेवटचा सामना असणार आहे. त्यानंतर पाकिस्तान थेट आशिया कप स्पर्धेत खेळताना दिसणार आहे.
आशिया कप स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. पाकिस्तानचा या स्पर्धेसाठी अ गटात समावेश करण्यात आला आहे. पाकिस्तान या स्पर्धेतील पहिला सामना 12 सप्टेंबरला ओमान विरुद्ध खेळणार आहे. तर पाकिस्तानसमोर 14 सप्टेंबरला टीम इंडियाचं आव्हान असणार आहे. या स्पर्धेकडे साऱ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे. मात्र वाढत्या विरोधामुळे सामना रद्द होण्याची शक्यता आहे.
आगामी आशिया कप 2025 स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर होणारी त्रिकोणी मालिका पाकिस्तान, यूएई आणि अफगाणिस्तान यांच्यासाठी निर्णायक असणार आहे. या मालिकेचं आयोजन हे शारजाहमध्ये करण्यात आलं आहे. तर आशिया कप स्पर्धेतील सामने हे दुबई आणि अबुधाबीत आयोजित करण्यात आले आहेत.
अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान, 29 ऑगस्ट, शारजाह
यूएई विरुद्ध पाकिस्तान, 30 ऑगस्ट, शारजाह
पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान, 2 सप्टेंबर, शारजाह
पाकिस्तान विरुद्ध यूएई, 4 सप्टेंबर शारजाह
दुबई आणि शारजाहात फार कमी अंतर आहे. या दोन्ही ठिकाणची खेळपट्टी जवळपास सारखीच आहे. त्यामुळे या तिन्ही संघांना आशिया कपआधी परिस्थितीसोबत जुळवून घेण्यास मदत होऊ शकते. याचा तिन्ही संघांना आशिया कप स्पर्धेत किती फायदा होणार? हे येत्या काही दिवसांतच स्पष्ट होईल.