पाकिस्तानी क्रिकेटपटूवर थेट दोन वर्षांची बंदी, नेमकं काय घडलं? इतकी मोठी शिक्षा देण्याचं कारण की…
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने कठोर पावलं उचलत एका खेळाडूवर दोन वर्षांची बंदी घातली आहे. इतकंच काय तर त्याला 10 पाकिस्तानी रुपयांचा दंडही ठोठावला आहे. पीसीबीच्या या निर्णयामुळे क्रीडाविश्वात खळबळ उडाली आहे.

पाकिस्तान क्रिकेटमध्ये पीसीबीच्या एका कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. पाकिस्तानी क्रिकेटपटू हमजा नजर याच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण पाकिस्ता क्रिकेट बोर्डाने त्याच्याविरोधात कठोर कारवाई करत दोन वर्षांची बंदी घातली आहे. इतकंच काय तर दंडही ठोठावला आहे. आता हमजा नजर पुढचे दोन वर्षे आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळू शकणार नाही. हमजा नजरने केलेल्या कृत्याप्रकरणी पीसीबीने एक तपास समिती गठीत केली होती. त्या समितीसमोर हमजा नजर आपली बाजू मांडण्यास सांगितलं होतं. त्याचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर उपलब्ध माहितीचा आढावा घेऊन समितीने आपला अहवाल पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे सुपू्र्द केला होता. त्यानंतर पाकिस्तान बोर्डाने कारवाईचा बडगा उचलला आहे. नुकतंच लीजेंड्स क्रिकेट स्पर्धेत भाग घेणाऱ्या खेळाडूंवर कारवाई करणार असल्याचं पाकिस्तानने जाहीर केलं होतं. त्यापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यापूर्वी हमजा नजरवर बंदी घातली आहे.
हमजा नजरवर बंदी घालण्याचं कारण की…
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने एक अहवाल सादर करत स्पष्ट केलं आहे. हमजा नजरवर दोन वर्षांसाठी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत खेळण्यास बंदी असेल. त्याचबरोबर त्याच्यावर 10 लाख पाकिस्तानी रुपयांचा दंडही ठोठावला आहे. हमजा नजरने पीसीबीमार्फत व्हिसासाठी अर्ज करताना खोटी माहिती दिली होती. त्यामुळे त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. अर्ज करताना त्याने खोटी आणि अपूर्ण माहिती दिली होती. तसेच काही तपशील लपवले होते. तसेच दिशाभूल करणारे विधानं केली होती.
हमजा नजर 27 वर्षांचा असून त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला अद्याप सुरूवात झालेली नाही. पण त्या आधीच त्याला बंदीला सामोरं जावं लागलं आहे. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमधील 27 डावात 748 धावा केल्या असून 26 बळी घेतले आहेत. त्याच्या नावावर एक शतक आणि पाच अर्धशतकं आहे. त्याने 15 लिस्ट ए सामन्यातील 13 डावात 192 धावा केल्या आहेत. इतकंच काय तर 18 विकेट घेतल्या आहे. हमजाने 10 टी20 सामन्यात 65 धावा केल्या आहेत आणि पाच विकेट घेतल्या आहेत.