
IND vs SA: प्रसिद्ध कृष्णा हा भारतासाठी डोकेदुखी ठरत आहे. विकेट घेणारा गोलंदाज की धावा देणारा गोलंदाज असा प्रश्न आता क्रीडाप्रेमींना पडला आहे. ठरावीक सामने सोडले तर प्रसिद्ध कृष्णा प्रत्येक सामन्यात महागडा ठरला आहे. आतापर्यंतचे आकडे याबाबत स्पष्ट काय सांगत आहे. त्याच्या सुमार गोलंदाजीमुळे भारताला दुसरा वनडे सामना गमवण्याची वेळ आली. असं असूनही प्रसिद्ध कृष्णाला वारंवार संधी देण्याचं कारण काय? भारतात त्याच्या इतक्या क्षमतेचे दुसरे गोलंदाज नाहीत का? असे एक ना अनेक प्रश्न क्रीडारसिक विचारत आहेत. कसोटी, वनडे आणि टी20 फॉर्मेटमध्ये त्याचा इकोनॉमी रेट हा सुमार असूनही त्याला वारंवार संधी देण्याचं कारण काय? चला जाणून घेऊयात या मागची कारणं
वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेच्या दृष्टीने प्रसिद्ध कृष्णावर इन्व्हेस्टमेंट केली जात असल्याचं बोललं जात आहे. वनडे वर्ल्डकप स्पर्धा दक्षिण अफ्रिकेत खेळली जाणार आहे. या खेळपट्ट्यांवर खूपच उसळी असते. प्रसिद्ध कृष्णा हिट द डॅक बॉलर आहे. म्हणजेच खेळपट्टीवर बॉल जोरात आपटण्याची क्षमता आहे. अशा गोलंदाजाची दक्षिण अफ्रिकेत गरज आहे. त्यामुळे टीम इंडिया त्याला जास्तीत जास्त संधी देण्याचा प्रयत्न करत आहे. प्रसिद्ध कृष्णासारखे गोलंदाज भारताकडे नाहीत. भारतात स्विंग आणि सीम गोलंदाज भरपूर आहे. पण प्रसिद्ध कृष्णा हाईटमुळे पेस आणि अतिरिक्त उसळी घेण्यास माहीर आहे. यामुळे फलंदाजाला शॉट खेळण्यात अडचण येते आणि विकेट मिळू शकते.
भारतात अशा प्रकारची गोलंदाजी फार काही प्रभावी ठरत नाही. पण दक्षिण अफ्रिकेत त्याचा उपयोग होऊ शकतो. पण त्याच्या आधीच त्याचं मनोबल ढासळलं तर त्याचा काही उपयोग होणार नाही, असं क्रीडाप्रेमी म्हणत आहे. विराट कोहली देखील प्रसिद्ध कृष्णाचा चाहता. कर्णधार असताना त्याने प्रसिद्ध कृष्णाचा उल्लेख भविष्य असा केला होता. पण दुखापतीमुळे त्याच्या करिअरला ब्रेक लागत गेला. सध्या त्याचा फॉर्मही नाही. त्यामुळे आता त्याला स्वत:ला सिद्ध करण्याशिवाय पर्याय नाही. तिसऱ्या वनडे सामन्यात त्याला संधी मिळेल की नाही हा देखील प्रश्न आहे.