
आयपीएलच्या 18 व्या मोसमात रजत पाटीदार याच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने इतिहास घडवला. आरसीबीने नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झालेल्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने पंजाब किंग्सवर मात करत आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं. आरसीबीची यासह 18 वर्षांपासून आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची प्रतिक्षा संपली. आरसीबी अंतिम फेरीत चौथ्या प्रयत्नात विजय मिळवण्यात यशस्वी ठरली. आरसीबीने पंजाबसमोर 191 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पंजाबनेही जोरदार प्रयत्न केले. मात्र पंजाबला 184 धावांपर्यंतच पोहचता आलं. आरसीबीने अशाप्रकारे 6 धावांनी ही ट्रॉफी जिंकली. पंजाबची अंतिम फेरीत पराभव होण्याची एकूण दुसरी तर 2014 नंतरची पहिलीच वेळ ठरली. पीबीकेएसची मालकीण आणि अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. प्रीती झिंटाने या पोस्टमध्ये काय म्हटलं? जाणून घेऊयात.
प्रीती झिंटा हीने अंतिम सामन्यात झालेल्या पराभवानंतर एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन भावूक आणि प्रेरणादायक संदेशा दिला आहे. प्रीतीने या संदेशातून खेळाडूंचा उत्साह वाढवला आणि त्यांचं कौतुक केलं आहे. या हंगामाचा शेवट अपेक्षित झाला नाही. मात्र अनकॅप्ड खेळाडूंनी केलेली कामगिरी पाहून चांगलं वाटलं, असं प्रीतीने तिच्या पोस्टमध्ये नमूद केलंय.
“या हंगामाचा शेवट तसा झाला नाही जसं आम्हाला अपेक्षित होतं. मात्र हा प्रवास शानदार होता. हा प्रवास रोमांचक, मनोरंजक आणि प्रेरणादायी होता. मला आमची युवा टीम, वाघांनी (खेळाडूंनी) दिलेला लढा आणि त्यांचा उत्साह फार आवडला. मला आमचा कर्णधार (श्रेयस अय्यर), आमच्या सरपंचाने ज्या प्रकारने नेतृत्व केलं, ते फार आवडलं. तसेच भारतीय अनकॅप्ड खेळाडूंनी शानदार कामगिरी केली”, असं म्हणत प्रीतीने कर्णधार, खेळाडूंसह साऱ्या संघाचंच कौतुक केलं.
पंजाबने या मोसमात उल्लेखनीय कामगिरी केली. पंजाबने 18 व्या मोसमाआधी श्रेयस अय्यरची कर्णधारपदी नियुक्ती केली. श्रेयस अय्यरने हा निर्णय योग्य ठरवला. श्रेयसने पंजाबला अंतिम फेरीपर्यंत पोहचवलं. मात्र पंजाबचं स्वप्न थोडक्यासाठी भंग झालं. पंजाब साखळी फेरीत पहिल्या स्थानी राहिली. तर क्वालिफायर 1 मध्ये पराभूत झाल्यानंतर क्वालिफायर 2 मध्ये मुंबईवर मात करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला.
प्रीती झिंटाची एक्स पोस्ट
It didn’t end the way we wanted it to but….the journey was spectacular ! It was exciting, entertaining & it was inspiring. I loved the fight & the grit our young team, our shers showed throughout the tournament. I loved the way our captain, our Sarpanch lead from the front &… pic.twitter.com/kUtRs908aS
— Preity G Zinta (@realpreityzinta) June 6, 2025
पंजाबची श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वात फायनलमध्ये पोहचण्याची ही पहिली तर एकूण दुसरी वेळ ठरली. तसेच पंजाब 11 वर्षांनंतर प्लेऑफमध्ये पोहचण्यात यशस्वी ठरली. पंजाबचा प्रवास अद्याप पूर्ण झालेला नाही. आम्ही पुढच्या वर्षी आणखी कणखर होऊन परतू आणि उर्वरित काम पूर्ण करु अर्थात ट्रॉफी जिंकून”, असा विश्वास प्रीती झिंटा हीने व्यक्त केला.