
रणजी ट्रॉफी 2025-26 स्पर्धा सुरू झाल्यानंतर जम्मू काश्मीरचा संघ जेतेपद मिळवेल असा कोणी विचारही केला नव्हता. कारण आतापर्यंतचा या संघाचा रेकॉर्ड जेतेपदाचा नाही. पण या स्पर्धेत जम्मू काश्मीर संघाने साखळी फेरीपासून छाप पाडली. भल्याभल्या संघांना पराभवाची धूळ चारली. उपांत्यपूर्व आणि उपांत्य फेरीत पहिल्यांदा धडक मारली. तसेच अंतिम फेरी गाठण्यातही यश मिळवलं. जम्मू काश्मीरचा चढता आलेख पाहून प्रत्येक क्रिकेटप्रेमींना आश्चर्याचा धक्का बसत होता. अंतिम फेरीत काय होते याची उत्सुकता होती. पण अंतिम फेरीतही जम्मू काश्मीरचं नाणं खणखणीत वाजलं. तसेच पहिल्यांदा जेतेपदावर नाव कोरण्याची किमया साधली. जम्मू काश्मीरने रणजी ट्रॉफीत 67 वर्षानंतर जेतेपद मिळवलं. या विजयासह जम्मू काश्मीरच्या नावावर एक विक्रम रचला गेला आहे. या विजयानंतर सर्वच स्तरातून जम्मू काश्मीर संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू काश्मीर संघाचं कौतुक केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोस्ट करत म्हणाले, ‘जम्मू आणि काश्मीर संघाचं त्यांच्या पहिल्या रणजी करंडक विजयाबद्दल अभिनंदन! हा ऐतिहासिक विजय संघाच्या उल्लेखनीय धैर्य, शिस्त आणि उत्साहाचे प्रतिबिंब आहे. हा जम्मू आणि काश्मीरच्या लोकांसाठी अभिमानाचा क्षण आहे आणि तो तेथील वाढत्या क्रीडा उत्साह आणि प्रतिभेला अधोरेखित करतो. या कामगिरीमुळे अनेक तरुण खेळाडूंना मोठी स्वप्ने पाहण्याची आणि अधिक खेळण्याची प्रेरणा मिळेल.’
Congratulations to the Jammu and Kashmir team for their first ever Ranji Trophy win! This historic triumph reflects remarkable grit, discipline and passion of the team. It is a proud moment for the people of Jammu and Kashmir and it highlights the growing sporting passion and… pic.twitter.com/3fJO89Z5F8
— Narendra Modi (@narendramodi) February 28, 2026
जम्मू काश्मीरने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. हा निर्णय योग्य होता. कारण पहिल्या डावात जम्मू काश्मीर संघाने 584 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना कर्नाटकचा संघ 293 धावा करून शकला. त्यामुळे पहिल्या डावात 291 धावांची आघाडी मिळाली आणि जम्मू काश्मीरचा विजय पक्का झाला. त्यानंतर दुसऱ्या डावात जम्मू काश्मीरने 4 गडी गमवून 342 धावांपर्यंत मजल मारली. तसेच पाचव्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रानंतरही खेळत होते. त्यामुळे दोन्ही संघांच्या कर्णधाराच्या संमतीनंतर हा सामना ड्रॉ केला गेला. या सामन्यात पहिल्या डावातील आघाडीमुळे जम्मू काश्मीरचा विजय झाला.