
भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशवाद्यांच्या 9 तळांवर एअर स्ट्राईक करत पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला. त्यानंतर दुसऱ्या दिवशीही (8 मे) ‘ऑपेरशन सिंदूर’ सुरुच आहे. भारताने या ऑपेरशन अंतर्गत पाकिस्तानला जन्माची अद्दल घडवली आहे. भारताच्या या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये दहशतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. पाकिस्तानमध्ये पळापळ पाहायला मिळत आहे. या कारवाईचा परिणाम हा क्रिकेटवरही झाला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सुरक्षेच्या कारणामुळे पीएसएल (PSL 2025) स्पर्धेतील उर्वरित सामने हे आता कराचीत खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. पीसीबीच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला.
भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचा जळफळाट झाला. त्यामुळे पाकिस्तानने भारतातील 15 शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारताने हा डाव हाणून पाडला. भारताने पाकिस्तानधील 12 शहरांवर ड्रोनने हल्ला केला. भारताने या हल्ल्यात लाहोर येथीर रडार सिस्टीम उद्धस्त केली. भारताने केलेल्या ड्रोन हल्ल्यात रावळपिंडी स्टेडियम उद्धवस्त झालं आहे. याच स्टेडियममध्ये काही तासांमध्येच पीएसएल स्पर्धेतील सामना होणार होता.
भारताने केलेल्या ड्रोन हल्ल्यात रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमचं नुकसान झालंय. या स्टेडियममध्ये आज (8 मे) संध्याकाळी पेशावर झाल्मी विरुद्ध कराची किंग्ज यांच्यात सामना होणार होता. मात्र या हल्ल्यानंतर या स्पर्धेतील संपूर्ण सामने कराचीत होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज डेव्हिड वॉर्नर हा कराची संघाचा कर्णधार आहे. तर बाबर आझम पेशावर झाल्मी टीमचा कॅप्टन आहे.
पाकिस्तान सुपर लीग 2025 हंगामात 6 संघांमध्ये चुरस आहे. पेशावर झाल्मी, मुल्तान सुल्तान्स, लाहोर कलंदर्स, कराची किंग्स, इस्लामाबाद युनायटेड आणि क्वेटा ग्लेडीएटर्स असे 6 संघ या स्पर्धेत खेळत आहेत. या हंगामाचं आयोजन हे 11 एप्रिल ते 18 मे दरम्यान करण्यात आलंय. या हंगामात बुधवार 7 मे पर्यंत 26 सामने खेळवण्यात आले आहेत.
पहलगाम हल्ल्याच्या काही तासांनंतर भारतात पीएसएल स्पर्धेच्या प्रसारणावर बंदी टाकण्यात आली होती. भारतात मोठ्या प्रमाणात क्रिकेट चाहते आहेत. त्यामुळे भारतीय क्रिकेट चाहते देशासह जगभरात होणारे क्रिकेट सामने पाहत असतात. भारतात पीएसएल स्पर्धा पाहणारा मोठा वर्ग आहे.त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला याचा मोठ्या प्रमाणात फायदा होतो. हाच मुद्दा लक्षात घेत भारतात पीएसएलच्या प्रसारणावर बंदी टाकण्यात आली. त्यामुळे पाकिस्तानची आर्थिक कोंडी केली गेली.