
आयसीसी टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत टीम इंडिया करो या मरोच्या स्थितीत आली आहे. भारताला उपांत्य फेरी गाठायची तर वेस्ट इंडिजला पराभूत करणं आवश्यक आहे. असं असताना या सामन्यापूर्वी टीम इंडियाचं मनोबल वाढलं आहे. या सामन्यात अभिषेक शर्माची बॅट तळपल्याने क्रीडाप्रेमींचा आनंद द्विगुणित झाला आहे. या सामन्यात अभिषेक शर्माने 30 चेंडूत 55 धावांची खेळी केली. सलग तीन सामन्यात शून्यावर बाद झाल्याने त्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं. पण झिम्बाब्वे विरूद्धच्या सामन्यात अभिषेक शर्माची बॅट तळपली. आता अभिषेक शर्मा पुन्हा एकदा फॉर्मात परतला आहे. बाद फेरीपूर्वीच त्याची बॅट तळपल्याने क्रीडाप्रेमींची जीव भांड्यात पडला आहे. झिम्बाब्वेविरुद्ध विजय मिळवताच आर अश्विनने पाकिस्तानचा माजी गोलंदाज मोहम्मद आमिरची फिरकी घेतली. आमिरने अभिषेकबाबत केलेल्या वक्त्तव्यावर कठोर शब्दात सुनावणी केली. आर अश्विनच्या मते अभिषेक शर्माची आक्रमकता चुकीच्या पद्धतीने स्लॉगिंग समजली जात आहे. खरं तर त्याचं तंत्र अधिक चांगलं आहे.
अभिषेक शर्मा हा स्लॉगर आहे असं पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने सांगितलं होतं. ‘अभिषेकच्या फलंदाजीत डिफेंसिव्ह गिअर नाही आणि फक्त मोठे फटके मारण्यावर अवलंबून आहे.’, असं मोहम्मद आमिर म्हणाला होता. पण सुपर 8 फेरीत झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात अभिषेक शर्माने जबरदस्त खेळी करत विरोधकांची तोंड बंद केली. आर अश्विनने अभिषेक शर्माला स्लॉगर म्हणणं चुकीचं असल्याचं सांगितलं.
आर अश्विन म्हणाला की, ‘तुम्ही त्याच्या खेळाबाबत काहीही म्हणू शकता. पण तो स्लॉगर नाही. त्याच्याकडे आजच्या खेळातील सर्वात चांगली बॅट स्विंग आहे. आम्हाला सर्वांना माहिती आहे की युवराज सिंग त्याचा मेंटॉर आहे. मला वाटते की त्याची बॅट स्विंग युवराजपेक्षा चांगली आहे. त्याच्यापेक्षा चांगली बॅट स्विंग करणं कठीण आहे. जेव्हा अभिषेक शर्मा चेंडूवर प्रहार करतो तेव्हा चेंडू खूप लांब जातो. पण लोकं त्याला स्लॉगर समजतात. पण त्याच्याकडे एकच उणीव आहे की, प्रत्येक चेंडूवर तितकीच क्षमता दाखवतो.’