राहुल द्रविडने त्या निर्णयासाठी मानले रोहित शर्माचे आभार, झालं असं होतं की…

टी20 वर्ल्डकप जेतेपदावर अखेर टीम इंडियाने नाव कोरलं आहे. 11 वर्षांपासूनचा आयसीसी चषकांचा दुष्काळ या निमित्ताने दूर झाला आहे. राहुल द्रविड यांच्या प्रशिक्षकपदाच्या कार्यकाळाचा शेवट गोड झाला. दोन तीन संधी हुकल्यानंतर अखेर जेतेपद मिळालं आहे. यानंतर राहुल द्रविडने मनातली गोष्ट सर्वांसमोर मांडली आहे.

राहुल द्रविडने त्या निर्णयासाठी मानले रोहित शर्माचे आभार, झालं असं होतं की...
Image Credit source: BCCI
| Updated on: Jul 02, 2024 | 3:24 PM

टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेत टीम इंडियाने दक्षिण अफ्रिकेचा 7 धावांनी धुव्वा उडवला आणि जेतेपदावर नाव कोरलं. 17 वर्षानंतर टी20 वर्ल्डकप आणि 11 वर्षानंतर आयसीसी चषकावर नाव कोरलं आहे. 11 वर्षांच्या कालावधीत अनेक चढउतार टीम इंडियाने पाहिले. काही संधी चालून आल्या मात्र त्या संधीचं सोनं करण्यात अपयश आलं. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत दोनदा जेतेपद हुकलं. वनडे वर्ल्डकप स्पर्धेत तर हातातोंडाशी आलेला घास गमवावा लागला. संपूर्ण स्पर्धेत एकही सामना गमावला नव्हता. मात्र अंतिम सामन्यात पराभव झाला आणि जेतेपदाचं स्वप्न भंगलं. मात्र नोव्हेंबर 2023 ते जून 2024 या कालावधीत बरंच काही घडलं. आता याबाबत प्रशिक्षक राहुल द्रविड याने खुलासा केला आहे. जेतेपदानंतर ड्रेसिंग रुमधील फेअरवेल स्पीचमध्ये राहुल द्रविडने आपलं मन मोकळं केलं. वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील पराभवानंतर राहुल द्रविड प्रशिक्षकपदावरून पायउतार होणार होता. पण रोहित शर्माने त्याचं मन वळवण्यास मदत केली आणि टी20 वर्ल्डकप स्पर्धेपर्यंत त्याने प्रशिक्षकपदाची भूमिका स्वीकारली.

“मला रोहित शर्माचे आभार मानायचे आहेत. खरंच त्याचे मनापासून आभार की त्याने माझं मन वळवलं. नोव्हेंबर महिन्यात त्याने प्रशिक्षकपदाची भूमिका टी20 वर्ल्डकपपर्यंत बजावण्याची विनंती केली. मला तुमच्यासोबत काम करताना एक वेगळाच आनंद मिळाला. रोहितने वेळ दिल्याबद्दल त्याचे विशेष आभार.कर्णधार आणि प्रशिक्षक म्हणून आम्हाला खूप वेळ चर्चा कराव्या लागतात. काही गोष्टींवर सहमत व्हावे लागते, तर कधी कधी असहमत व्हावं लागलं. पण खूप खूप धन्यवाद. मला वाटते की तुमच्यापैकी प्रत्येकाला एक व्यक्ती म्हणून जाणून घेताना आनंद वाटला. “, असं प्रशिक्षक राहुल द्रविड याने फेअरवेल स्पीचमध्ये सांगितलं.

“हे तुमचं यश आहे हे कायम लक्षात ठेवा. हे कोणा एकाचं यश नाही. हे संपूर्ण संघाचं यश आहे. आपण एक संघ म्हणून विजय मिळवला आहे. जेतेपदासाठी गेल्या महिनाभरात जे काही करायचं ते आपण सर्वांनी केलं आहे. हे सर्व यश तुमचं आहे. चांगल्या टीमच्या यशामागे कायम एक संस्था असते. मला खरंच बीसीसीआयसोबत काम करताना आनंद मिळाला. या यशासाठी बऱ्याच लोकांनी घाम गाळला आहे. तसेच इथपर्यंत पोहोचण्यास मदत केली आहे. आपल्यापैकी प्रत्येक जण या सिस्टमचा भाग आहोत. आपल्या प्रत्येकाला संस्थेने संधी दिली आहे. त्यामुळे तुम्हा सर्वांचे मनापासून आभार.”