
रणजी ट्रॉफी 2025 स्पर्धेत अंतिम फेरीसाठी 4 संघांमध्ये चुरस पाहायला मिळत आहे. एका बाजूला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये केरळ विरुद्ध गुजरात यांच्यात उपांत्य फेरीतील पहिला सामना खेळवण्यात येत आहे. तर उपांत्य फेरीतील दुसऱ्या सामन्यात विदर्भ विरुद्ध मुंबई आमनेसामने आहेत. विदर्भाने सामन्यातील चौथ्या दिवशी मुंबईला विजायसाठी 406 धावांचं आव्हान दिलं आहे. विदर्भाने यश राठोड याने केलेल्या दीडशतकी खेळीच्या जोरावर दुसऱ्या डावात ऑलआऊट 292 धावा केल्या. तर विदर्भाकडे 113 धावांची आघाडी होती. त्यामुळे मुंबईला अंतिम फेरीत पोहचण्यासाठी 406 धावांचं अवघड असं आव्हान मिळालं आहे.
विदर्भाने पहिल्या डावात ऑलआऊट 383 धावा केल्या. मुंबईला प्रत्युत्तरात 270 धावाच करता आल्या. त्यामुळे विदर्भाला 113 धावांची आघाडी मिळाली. विदर्भाने दुसऱ्या डावात 110.1 ओव्हरमध्ये ऑलआऊट 292 रन्स केल्या. यश राठोड याने 252 बॉलमध्ये 11 फोरसह 151 रन्स केल्या. कॅप्टन अक्षय वाडकर याने 52 धावांची खेळी केली. तर या व्यतिरिक्त मुंबईच्या गोलंदाजांनी एकालाही 30 पेक्षा अधिक धावा करुन दिल्या नाहीत. दानिश मालेवार याने 29, पार्थ रेखाडे याने 20 आणि ध्रुव शौरे याने 13 धावा जोडल्या. तर इतरांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. मुंबईकडून शम्स मुलानी याने सर्वाधिक 6 विकेट्स घेतल्या. तनुष कोटीयन याने तिघांना बाद केलं. तर शार्दूल ठाकुर याने 1 विकेट घेतली.
दरम्यान विकेटकीपर आकाश आनंद याने केलेल्या शतकामुळे मुंबईला पहिल्या डावात विदर्भाच्या 383 च्या प्रत्युत्तरात 92 ओव्हरमध्ये 270 धावांपर्यंत पोहचता आलं. आकाश आनंद याने मुंबईसाठी संकटमोचकाची भूमिका बजावली. आकाशने 256 बॉलमध्ये 11 फोरसह 106 धावा केल्या. तर त्याव्यतिरिक्त मुंबईकडून एकालाही 37 पेक्षा अधिक धावा करता आल्या नाहीत.शार्दूल ठाकुर याने 37, सिद्धेश लाड याने 35 आणि तनुष कोटीयनने 33 धावा केल्या. कर्णधार अजिंक्य रहाणे याने 18 धावा जोडल्या. तर सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे या स्टार फंलदाजांना भोपळाही फोडता आला नाही. विदर्भाकडून पार्थ रेखाडे याने 4 विकेट्स घेतल्या. यश ठाकुर आणि हर्ष दुबे या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर नचिकेत भूते आणि दर्शन नळकांडे या जोडीने 1-1 विकेट मिळवली.
विदर्भ प्लेइंग इलेव्हन : अक्षय वाडकर (कर्णधार आणि विकेटकीपर), अथर्व तायडे, ध्रुव शौरे, पार्थ रेखाडे, दानिश मलेवार, करुण नायर, यश राठोड, हर्ष दुबे, दर्शन नळकांडे, यश ठाकूर आणि नचिकेत भुते.
मुंबई प्लेइंग इलेव्हन : अजिंक्य रहाणे (कर्णधार), आयुष म्हात्रे, आकाश आनंद (विकेटकीपर), सिद्धेश लाड, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, शम्स मुलानी, शार्दुल ठाकूर, तनुष कोटीयन, मोहित अवस्थी आणि रॉयस्टन डायस.