MUM vs VID | विदर्भाची चौथ्या दिवशी जोरदार फाईटबॅक, विजयासाठी आणखी 290 धावांची गरज

Mumbai vs Vidarbha Ranji Trophy Final Day 4 Highlight | विदर्भ क्रिकेट टीमने मुंबई विरुद्ध रणजी ट्रॉफी फायनलच्या चौथ्या दिवशी जोरदार लढा दिला. विदर्भाने 250 पार मजल मारली. आता पाचवा दिवशी विजेता ठरणार आहे.

MUM vs VID | विदर्भाची चौथ्या दिवशी जोरदार फाईटबॅक, विजयासाठी आणखी 290 धावांची गरज
| Updated on: Mar 13, 2024 | 6:27 PM

मुंबई | मुंबई विरुद्ध विदर्भ यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये रणजी ट्रॉफी फायनलचा महामुकाबला खेळवण्यात येत आहे. या महामुकाबल्यातील चौथ्या दिवसाचा खेळ संपला आहे. विदर्भाने मुंबईने विजयसाठी दिलेल्या 538 धावांचा पाठलाग करताना दिवसाचा खेळ संपेपर्यंत 92 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 248 धावा केल्या. त्यामुळे विदर्भाला सामन्याच्या पाचव्या दिवशी विजयासाठी आणखी 290 धावा कराव्या लागणार आहेत. विदर्भाच्या फलंदाजांनी मुंबईच्या भेदक गोलंदाजाची जोरदार सामना केला. त्यामुळे आता पाचव्या दिवशी चांगलीच लढाई पाहायला मिळणार आहे.

मुंबईने पहिल्या डावात 224 धावा केल्या. तर विदर्भाला 105 धावांवर गुंडाळून 119 धावांची आघाडी घेतली. तर दुसऱ्या डावात मुंबईने ऑलआऊट 418 धावा केल्या. त्यामुळे विदर्भाला विजयासाठी तिसऱ्या दिवशी विजयासाठी 538 धावांचं आव्हान मिळालं. विदर्भाने तिसऱ्या दिवशी बिनबाद 10 धावा केल्या. चौथ्या दिवशी अथर्व तायडे आणि ध्रुव शौरी या दोघांनी सुरुवात केली. या दोघांनी 64 धावांची सलामी भागीदारी केली. त्यानंतर अथर्व तायडे 32 धावा करुन आऊट झाला. त्यानंतर 2 बॉलनंतर विदर्भाने दुसरी विकेट गमावली. ध्रुव शौरी 28 धावा करुन माघारी परतला. विदर्भाची सलामी जोडी अशाप्रकारे माघारी परतली. त्यामुळे विदर्भाची 2 बाद 64 अशी स्थिती झाली.

मुंबईने झटपट 2 धक्के दिल्याने विदर्भाची टीम बॅकफुटवर गेली. मात्र विदर्भाने हार मानली नाही. विदर्भाने जोरदार फाईटबॅक दिली. तिसऱ्या विकेटसाठी अमन मोखाडे आणि करुण नायर या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 30 ओव्हरमध्ये झुंजार खेळी करत 54 धावांची भागीदारी केली. अमन मोखाडे 32 धावा करुन आऊट झाला. त्यानंतर यश राठोड 7 धावा करुन मैदानाबाहेर गेला. यानंतर करुन नायर आणि कॅप्टन अक्षय वाडकर या दोघांनी पुन्हा चिवट खेळी करत विदर्भाचा डाव सावरला.

चौथ्या दिवसाचा खेळ संपला

वाडकर आणि नायर या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 90 धावांची भागीदारी केली. या दरम्यान करुन नायर याने अर्धशतक ठोकलं. मात्र अर्धशतकानंतर 6 धावा जोडल्यानंतर मुशीर खान याने करुणला रोखत ही जोडी फोडली. नायरने 56 धावांची खेळी केली. तर त्यानंतर वाडकर आणि हर्ष दूबे या दोघांनी चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत नाबाद 25 धावांची भागीदारी केली. वाडकर 56 आणि हर्ष 11 धावा करुन नाबाद परतले. तर मुंबईकडून मुशीर खान आणि तनुष कोटीयन या दोघांनी 2-2 विकेट्स घेतल्या. तर शम्स मुलानी याला 1 विकेट मिळाली.

मुंबई प्लेईंग ईलेव्हन | अजिंक्य रहाणे (कर्णधार), पृथ्वी शॉ, भूपेन लालवानी, मुशीर खान, श्रेयस अय्यर, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), शम्स मुलाणी, शार्दूल ठाकुर, तनुष कोटियन, धवल कुलकर्णी आणि तुषार देशपांडे.

विदर्भ प्लेईंग ईलेव्हन | अक्षय वाडकर (कॅप्टन आणि विकेटकीपर), अथर्व तायडे, ध्रुव शौरे, अमन मोखाडे, करुण नायर, यश राठोड, आदित्य सरवटे, उमेश यादव, हर्ष दुबे, यश ठाकुर आणि आदित्य ठाकरे.