
रणजी ट्रॉफी 2024-2025 स्पर्धेत मुंबई विरुद्ध हरयाणा यांच्यात उपांत्य पूर्व फेरीतील सामना हा इडन गार्डनमध्ये खेळवण्यात येत आहे. मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणे याने या सामन्यातील तिसऱ्या दिवशी दुसऱ्या डावात खणखणीत शतक ठोकलं आहे. रहाणेच्या या शतकामुळे मुंबई मजबूत स्थितीत पोहचली आहे. तसेच मुंबईने 300 पेक्षा अधिक धावांची आघाडी घेतली आहे. अजिंक्य रहाणे याच्या फर्स्ट क्लास क्रिकेटमधील हे 41 वं शतक ठरलं आहे.
मुंबईने 48 धावांवर दुसरी विकेट गमावली. त्यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणे मैदानात आला. त्यानंतर सिद्धेश लाड आणि रहाणे या तिघांनी तिसऱ्या विकेटसाठी 52 धावांची भागीदारी केली. त्यानंतर सिद्धेश 43 धावा करुन आऊट झाला. रहाणेने त्यानंतर सूर्यकुमार यादव याच्यासह मुंबईचा डाव सावरला. रहाणे आणि सूर्यकुमार यादव या जोडीने चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. अजिंक्य आणि सूर्यकुमार या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 129 धावांची भागीदारी केली. सूर्याने 86 बॉलमध्ये 70 रन्स केल्या. रहाणेला शतक करण्याची संधी होती. मात्र त्याला त्यात यश आलं नाही.
सू्र्यानंतर शिवम दुबे मैदानात आला. शिवमने अजिंक्यला चांगली साथ दिली. रहाणेने या भागीदारीदरम्यान शतक झळकावलं. रहाणेने 160 चेंडूत 12 चौकारांच्या मदतीने हे शतक केलं. मात्र अजिंक्य शतकानंतर अवघ्या काही धावा करुन आऊट झाला. रहाणे याने 180 बॉलमध्ये 60 च्या स्ट्राईक रेटने 108 धावा केल्या. रहाणेच्या या खेळीत 13 चौकारांचा समावेश होता.
दरम्यान रहाणेने या सामन्यातील पहिल्या डावात 31 धावा केल्या. मुंबईने पिहल्या डावात 315 धावांपर्यंत मजल मारली. तनुष कोटीयन याने 97 आणि शम्स मुलानी याने 91 धावांचं योगदान दिलं. या दोघांनी केलेल्या या खेळीमुळे मुंबईला 300 पार पोहचता आलं. हरयाणाने प्रत्युत्तरात 301 धावा केल्या. त्यामुळे मुंबईला 14 धावांची आघाडी मिळाली.
हरियाणा प्लेइंग इलेव्हन : अंकित कुमार (कर्णधार), लक्ष्य दलाल, यशवर्धन दलाल, हिमांशू राणा, निशांत सिंधू, रोहित परमोद शर्मा (विकेटकेपर), जयंत यादव, सुमित कुमार, अंशुल कंबोज, अनुज ठकराल आणि अजित चहल.
मुंबई प्लेइंग इलेव्हन : अजिंक्य रहाणे (कर्णधार), आयुष म्हात्रे, आकाश आनंद (विकेटकीपर), सिद्धेश लाड, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, शम्स मुलानी, शार्दुल ठाकूर, तनुष कोटियन, मोहित अवस्थी आणि रॉयस्टन डायस.