मोहम्मद शमीचं कडक कमबॅक, मध्यप्रदेशविरुद्ध 4 विकेट्स, ऑस्ट्रेलियाला टेन्शन

Mohammed Shami: मोहम्मद शमी याच्या दमदार कमबॅकमुळे हजारो किलोमीटर दूर ऑस्ट्रेलियाचं टेन्शन वाढलंय. शमीचा आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी समावेश केला जातो का? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

मोहम्मद शमीचं कडक कमबॅक, मध्यप्रदेशविरुद्ध 4 विकेट्स, ऑस्ट्रेलियाला टेन्शन
Mohammed Shami ranji trophy Bengal vs Madhya pradesh
| Updated on: Nov 14, 2024 | 2:46 PM

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने दुखापतीनंतर वर्षभराने दणक्यात कमबॅक करत आगामी बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी दावा ठोकला आहे. शमीने रणजी ट्रॉफी स्पर्धेतून बंगालकडून मध्यप्रदेशविरुद्धच्या सामन्यातून कमबॅक केलं. शमीने या पहिल्याच डावात धमाका उडवून दिला. शमीने 19 ओव्हरमध्ये 54 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. शमीच्या या भेदक बॉलिंगमुळे बंगालला पहिल्या डावात आघाडी घेता आली. बंगालने पहिल्या डावात 228 धावा केल्या. मात्र बंगालच्या गोलंदाजांनी मध्यप्रदेशला 167 धावांवर गुंडाळलं. त्यामुळे बंगालला 61 धावांची आघाडी मिळाली.

वर्षभरानंतर कमबॅक

मोहम्मद शमीने 360 दिवसांनी पुनरागमन केलं. शमी अखेरीस वनडे वर्ल्ड कप 2023 फायनलमध्ये खेळला होता. शमीला तेव्हापासून दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर रहावं लागलं. मात्र शमीने रणजी ट्रॉफी स्पर्धेतील पाचव्या फेरीतून कमबॅक करत आता बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी दावा ठोकला आहे. टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकूण 5 कसोटी सामने खेळणार आहे. त्यासाठी भारतीय संघाची घोषणा काही दिवसांपूर्वीच करण्यात आली आहे. मात्र आता निवड समिती आणि टीम मॅनेजमेंट शमीला स्पेशल एन्ट्री देणार का? हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे. मात्र शमीने 4 विकेट्स घेतल्याने आता ऑस्ट्रेलियाचं टेन्शन वाढलं असणार इतकं मात्र खरं.

शमीला सामन्यातील पहिल्या दिवशी मध्यप्रदेशविरुद्ध एकही विकेट मिळाली नाही. शमीने पहिल्या दिवशी 10 ओव्हरमध्ये 34 धावा दिल्या. मात्र शमी दुसऱ्या दिवशी यशस्वी ठरला आणि विकेट्स मिळवल्या. शमीने त्याचा लहान भाऊ मोहम्मद कैफ याच्यासह मध्यप्रदेशच्या फलंदाजांना बाद केलं. कैफने 13 ओव्हरमध्ये 41 धावा देत 2 विकेट्स घेतल्या.

शमीच्या पुनरागमनात 4 विकेट्स

मध्य प्रदेश प्लेइंग इलेव्हन : शुभम शर्मा (कर्णधार), हिमांशू मंत्री (विकेटकीपर), रजत पाटीदार, हरप्रीत सिंग भाटिया, व्यंकटेश अय्यर, सुभ्रांशु सेनापती, आर्यन पांडे, सरांश जैन, कुमार कार्तिकेय, अनुभव अग्रवाल आणि कुलवंत खेजरोलिया.

बंगाल प्लेइंग इलेव्हन : अनुस्तुप मजुमदार (कॅप्टन), शुवम डे, सुदीप चॅटर्जी, सुदीप कुमार घरामी, शाहबाज अहमद, मोहम्मद कैफ, रिद्धिमान साहा (विकेटकीपर), रिटिक चॅटर्जी, सूरज सिंधू जयस्वाल, मोहम्मद शमी आणि रोहित कुमार.