VIDEO | निरोपावेळी रवी शास्त्रींचा टीम इंडियाला 20 सेकंदांचा संदेश, ड्रेसिंग रुममधील वातावरण भावूक

| Updated on: Nov 09, 2021 | 12:01 PM

रवी शास्त्री टीम इंडियाचा निरोप घेत असताना भारतीय संघांच्या ड्रेसिंग रुममधील वातावरण भावूक झालं होतं. यावेळी रवी शास्त्रींनी गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर यांना मिठी मारली.

VIDEO | निरोपावेळी रवी शास्त्रींचा टीम इंडियाला 20 सेकंदांचा संदेश, ड्रेसिंग रुममधील वातावरण भावूक
Ravi Shastri
Follow us on

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. यूएईत सुरु असलेल्या टी-20 विश्वचषकानंतर शास्त्रींना औपचारिकपणे राजीनामा देणे गरजेचे होते. मात्र टी-20 विश्वचषकातील भारताचं आव्हान ग्रुप स्टेजमध्येच संपुष्टात आल्याने सोमवारी भारत आणि नामिबिया या संघांमध्ये खेळवण्यात आलेला सामना प्रशिक्षक रवी शास्त्रींच्या कार्यकाळातला भारताचा शेवटचा सामना ठरला. या सामन्यानंतर भारतीय संघातील खेळाडूंचा निरोप घेताना रवी शास्त्री आणि टीम इंडियाचे खेळाडू भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. (Ravi Shastri gives small speech in Team India’s Dressing room to sign off as Head Coach)

रवी शास्त्री टीम इंडियाचा निरोप घेत असताना भारतीय संघांच्या ड्रेसिंग रुममधील वातावरण भावूक झालं होतं. यावेळी रवी शास्त्रींनी गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर यांना मिठी मारली. वास्तविक, रवी शास्त्रीसोबतच या दोघांचाही कार्यकाळ संपला आहे. ज्या ड्रेसिंग रूमचं वातावरण नेहमी एनर्जेटिक असायचं, तिथे एक हळवेपणा जाणवत होता. प्रशिक्षकाप्रती खेळाडूंचे मन जड झाले होते. मात्र, रवी शास्त्री केवळ टाटा-बाय बाय करुन ड्रेसिंग रुममधून बाहेर पडले नाहीत, जाण्यापूर्वी त्यांनी खेळाडूंना 20 सेकंदांचा संदेश दिला आणि प्रत्येक खेळाडूला मिठी मारुन त्यांचा निरोप घेतला.

रवी शास्त्रींनी आपल्या 20 सेकंदांच्या संदेशाने टीम इंडियाच्या खेळाडूंना जातानाही उत्साही करण्याचे काम केले. या संदेशाद्वारे त्यांनी त्यांच्या कामगिरीचं कौतुक केलं. ज्या संघांविरुद्ध भारताने यापूर्वी कधीही विजय मिळवला नव्हता अशा देशांना भारताने त्यांच्या देशात जाऊन हरवल्याचं सांगून संघाचं कौतुक केलं.

काय म्हणाले रवी शास्त्री?

आपल्या 20 सेकंदांच्या भाषणात रवी शास्त्री म्हणाले की, आयसीसीचे विजेतेपद आपण जिंकू शकलो नाही, याची मला खंत वाटत राहील. मात्र त्याचवेळी आपला या संघावर पूर्ण विश्वास असल्याचेही त्यांनी सांगितले. हा संघ संधीचे सोने करेल. खेळाडू अनुभवातून शिकतील आणि जिंकतील. रवी शास्त्री यांच्या ड्रेसिंग रुममध्ये झालेल्या निरोपाचा आणि त्यांच्या भाषणाचा व्हिडिओ बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे. दरम्यान, शास्त्री यानी या छोट्याशा संदेशानंतर भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूला आणि सपोर्ट स्टाफमधील प्रत्येक सदस्याला मिठी मारुन निरोप घेतला.

रवी शास्त्री यांनी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला असून आता माजी दिग्गज क्रिकेटपटू राहुल द्रविड ही जागा घेणार असल्याचे काही दिवसांपूर्वीच समोर आले आहे.

इतर बातम्या

India vs Namibia T20 world cup Result: स्पर्धेचा शेवट गोड, भारताचा नामिबीयावर 9 गडी राखून विजय

India vs Namibia Toss result: अखेरच्या सामन्यात विराटने जिंकला टॉस, एका बदलासह भारतीय संघ मैदानात

न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती, ऋतुराज गायकवाडची जागा पक्की, रोहितकडे कर्णधारपद?

(Ravi Shastri gives small speech in Team India’s Dressing room to sign off as Head Coach)