महेंद्रसिंह धोनी याच्या वाढदिवसाला रवींद्र जडेजा याने केला असा मेसेज, शुभेच्छांसह असं काही बोलून गेला

महेंद्रसिंह धोनी शुक्रवारी 42 वर्षांचा झाला असून त्याला सर्वच स्तरातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहे. महेंद्रसिंह धोनी याला टीममेट रवींद्र जडेजा यानेही खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.

महेंद्रसिंह धोनी याच्या वाढदिवसाला रवींद्र जडेजा याने केला असा मेसेज, शुभेच्छांसह असं काही बोलून गेला
महेंद्रसिंह धोनीच्या वाढदिवसाला रवींद्र जडेजा याने साधला नेम, केला असा मेसेज आणि म्हणाला....
| Updated on: Jul 07, 2023 | 4:17 PM

मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेत महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने जेतेपद पटकावलं आहे. जेतेपदासाठी रवींद्र जडेजाची भूमिका महत्त्वाची ठरली होती. जडेजा आणि धोनी यांचं वेगळं असं नातं आहे. आयपीएल स्पर्धेदरम्यान या दोघांचं फिस्कटल्याची चर्चा रंगली होती. मात्र त्या निव्वळ अफवा असल्याचं नंतर स्पष्ट झालं. जेतेपद मिळवल्यानंतर महेंद्रसिंह धोनी याने रवींद्र जडेजा याला उचलून धरलं होतं. तो क्षण कायमच क्रीडाप्रेमींच्या लक्षात राहणार आहे. असं सर्व घडामोडी घडल्यानंतर महेंद्रसिंह धोनी आणि रवींद्र जडेजा एकामेकांचा किती आदर करतात हे स्पष्ट झालं आहे. 7 जुलै रोजी महेंद्रसिंह धोनी याचा वाढदिवस असतो. महेंद्रसिंह धोनी आता 42 वर्षांचा झाला आहे.

महेंद्रसिंह धोनी याच्या वाढदिवसानिमित्त रवींद्र जडेजा याने भावनिक पोस्ट केली आहे. महेंद्रसिंह धोनीसोबत असलेला फोटो शेअर करत लिहिलं आहे की, “2009 पासून आतापर्यंत एक अशी व्यक्ती आहे की मी त्याच्याजवळ कधीही जाऊ शकतो. माही भाई तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. लवकरच आपण पिवळ्या जर्सीत भेटूयात.” त्याचबरोबर हॅशटॅग रिस्पेक्ट असं लिहिलं आहे.

महेंद्रसिंह धोनी क्रिकेटविश्वातलं मोठं नाव झालं आहे. धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियाने टी 20 वर्ल्डकप, वनडे वर्ल्डकप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. त्याचबरोबर चेन्नई सुपर किंग्सला पाच वेळा आयपीएल जेतेपद जिंकून देण्याची मोलाची भूमिका बजावली आहे. नुकत्याच झालेल्या आयपीएल स्पर्धेत धोनीच्या नेतृत्वात अंतिम सामन्यात गुजरातला पराभूत केलं होतं.

महेंद्रसिंह धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. पण आयपीएलमध्ये त्याचा जलवा कायम आहे. वय वर्षे 42 झालं असलं तरी धोनी क्रिकेटमधील उत्साह आणि फिटनेस कायम आहे. त्यामुळे धोनी 2024 आयपीएल स्पर्धा खेळेल असं बोललं जात आहे. रवींद्र जडेजा याच्या ट्वीटमुळे धोनी खेळेल असंच दिसत आहे. आयपीएल 2023 स्पर्धा जिंकल्यानंतर रवींद्र जडेजा याने हा विजय महेंद्रसिंह धोनीला समर्पित केला होता.

महेंद्रसिंह धोनी याने 250 आयपीएल सामने खेळले आहेत. यात महेंद्रसिंह धोनी याने 5082 धावा केल्या आहेत. यात त्याने 24 अर्धशतकं झळकावली आहेत. त्याचबरोबर 84 ही सर्वोत्तम खेळी राहिली आहे.