
टीम इंडियाच्या वनडे संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी टी20 आणि कसोटी फॉर्मेटला रामराम ठोकला आहे. दोघंही आता फक्त वनडे सामने खेळताना दिसणार आहे. त्यामुळे कधी एकदा हे दोघं मैदानात उतरतील याची उत्सुकता आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत दोघं शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळले होते. ही स्पर्धा संपून आता सहा महिन्याचा अवधी लोटला आहे. तेव्हापासून आतापर्यंत एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेले नाहीत. आयपीएल स्पर्धेत दोघेही दिसले. पण त्या दरम्यान कसोटी संघातून निवृत्ती जाहीर केली. त्यामुळे या दोघांना पुन्हा मैदानात पाहण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. कारण सध्या तरी वनडे मालिकाच नाही. असं असताना चॅम्पियन्स ट्रॉफीवेळीचा एक व्हिडीओ ऋषभ पंतने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताने अंतिम फेरीत न्यूझीलंडला पराभूत करून जेतेपदावर नाव कोरलं. हा सामना भारताने 4 विकेट राखून जिंकला. या विजयानंतर ड्रेसिंग रूममध्ये जल्लोष करण्यात आला. यावेळी ऋषभ पंत व्हिडीओ शूट करत होता. तेव्हा रोहित शर्माने मजेशीर शब्दात ऋषभ पंतला उत्तर दिलं. त्या उत्तराची चर्चा आता सोशल मीडियावर सुरु आहे. या व्हिडीओत ऋषभ पंतने रवींद्र जडेजा, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांच्याही प्रतिक्रिया रेकॉर्ड केल्या आहेत. शेवटी पंत रोहित शर्माला विचारतो की, भावा स्टंप घेऊन कुठे चालला आहेस?
Happy Independence Day, India. 🇮🇳
Some moments stay with you forever and winning for India is at the top of the list. Proud to be Indian.#RP17 📷🕶️ pic.twitter.com/pfgr1tg7da— Rishabh Pant (@RishabhPant17) August 15, 2025
रोहित शर्माने मिश्किल शब्दात पंतला उत्तर देत म्हणाला की, ‘काय… रिटायरमेंट घेऊ का? प्रत्येकवेळी जिंकलो तर रिटायरमेंट घेत बसू का?’ यावर ऋषभ पंतने हसत बोलला की, ‘मला तर वाटते की खेळावं.’ रोहित शर्मा आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यात वनडे मालिका खेळेल. दरम्यान एका मिडिया रिपोर्टनुसार, हे दोन्ही फलंदाज 2027 च्या विश्वचषकासाठी संघ व्यवस्थापनाच्या योजनांचा भाग नाहीत. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर निवृत्ती घ्यावी लागू शकते. दुसरीकडे, बीसीसीआयमध्ये अशीही चर्चा आहे की ऑस्ट्रेलिया मालिकेपूर्वी या दोघांनीही लय परत मिळवावी.