Video : शून्यावर बाद झालेल्या वैभव सूर्यवंशीचं रोहित शर्माने असं वाढवलं मनोबल, चाहत्यांकडून कृतीचं कौतुक

आयपीएल 2025 स्पर्धेत सर्वाधिक चर्चा झाली ती 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीची.. पदार्पणाच्या तिसऱ्या सामन्यातच शतक ठोकलं आणि सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला. टीम इंडियाचं भवितव्य म्हणून त्याच्याकडे पाहीलं जात आहे. असं असताना चौथ्या सामन्यात मात्र खातंही खोलता आलं नाही. सामना संपल्यानंतर रोहित शर्मा त्याच्याकडे गेला आणि प्रोत्साहन दिलं.

Video : शून्यावर बाद झालेल्या वैभव सूर्यवंशीचं रोहित शर्माने असं वाढवलं मनोबल, चाहत्यांकडून कृतीचं कौतुक
वैभव सूर्यवंशी आणि रोहित शर्मा
Image Credit source: Twitter
| Updated on: May 02, 2025 | 4:04 PM

आयपीएल 2025 स्पर्धेत मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना पार पडला. हा सामना मुंबई इंडियन्सने 100 धावांनी जिंकला. खरं तर या सामन्यात वैभव सूर्यवंशीकडे नजरा लागून होत्या. कारण त्याने या आधी गुजरात टायटन्सविरुद्ध शतकी खेळी केली होती. त्यामुळे ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह आणि दीपक चाहरसारख्या दिग्गज गोलंदाजांचा सामना करायचा होता. मात्र वैभव सूर्यवंशी दोन चेंडू खेळून खातं न खोलता बाद झाला. त्यामुळे वैभव सूर्यवंशी नाराज झाल्याचं दिसलं. सामना संपल्यानंतर दोन्ही संघांनी हस्तांदोलन केले तेव्हा रोहित शर्माने विशेषतः वैभवशी संपर्क साधला आणि त्याला सांत्वनाचे काही सकारात्मक शब्द सांगितले. सामन्यादरम्यान समालोचन करत असलेल्या रवी शास्त्री यांनीही सांगितले की, “तो शिकेल. रोहित शर्माकडून प्रोत्साहनाचे काही चांगले शब्द मिळाले.”

वैभव सूर्यवंशी आयपीएल 2025 स्पर्धेत आतापर्यंत चार सामने खेळला आहे. त्याने खेळलेल्या चार डावात 151 धावा केल्या आहे. संजू सॅमसनच्या दुखापतीमुळे त्याला आयीपएलमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात त्याने 20 चेंडूत 34 धावांची खेळी केली. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध 12 चेंडूत 16 धावा केल्या. तर वैभवने कारकिर्दिती तिसऱ्या आयपीएल सामन्यात शतक ठोकलं. त्याने 35 चेंडूत शतक ठोकत सर्वात युवा फलंदाज ठरला.

चेन्नई सुपर किंग्सनंतर राजस्थान रॉयल्स या स्पर्धेतून बाद होणारा दुसरा संघ ठरला आहे. मुंबई इंडियन्सने विजयासाठी 217 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र राजस्थान रॉयल्सला फक्त 117 धावा करता आल्या. राजस्थानचा संपूर्ण संघ 16.1 षटकात बाद झाला. या पराभवामुळे राजस्थान रॉयल्स संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाद झाला आहे. राजस्थान रॉयल्सचे औपचारिक तीन सामने शिल्लक आहे. 4 मे रोजी कोलकाता नाईट रायडर्स, 12 मे रोजी चेन्नई सुपर किंग्स आणि 16 मे रोजी पंजाब किंग्सशी सामना होणार आहे. या तीन सामन्यात वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे.