
टीम इंडियाने अहमदाबादमधील तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना 142 धावांनी जिंकला. टीम इंडयाने या विजयासह इंग्लंडवर 3-0 अशा फरकाने मालिका विजय मिळवला. टीम इंडियाने नागपूर, कटकनंतर अहमदाबादमध्येही एकतर्फी विजय मिळवला. टीम इंडियाने अहमदाबादमध्ये 356 धावा केल्या. तर इंग्लंडला प्रत्युत्तरात 214 धावाच करता आल्या. टीम इंडियाने या मोठ्या विजयसह अनेक रेकॉर्ड्स केले. तसेच रोहित शर्मा याने कर्णधार म्हणून मोठा कारनामा केला. रोहितने यासह महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली या माजी कर्णधारांना मागे टाकलं. अहमदाबादमध्ये नक्की कोणते 5 रेकॉर्ड्स ब्रेक झाले? याबाबत जाणून घेऊयात.
रोहित शर्मा 4 द्विपक्षीय मालिकेत प्रतिस्पर्धी संघाला एकही सामना जिंकून न देणारा पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे. रोहितच्या नेतृत्वात टीम इंडियाने एकदिवसीय मालिकेत वेस्टइंडीज, श्रीलंका, न्यूझीलंड आणि इंग्लंडविरुद्ध एकही सामना गमावला नाही. रोहितने यासह विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनी या दोघांना मागे टाकलं. या दोघांनी कर्णधार म्हणून भारताला 3-3 द्विपक्षीय एकदिवसीय मालिकेत एकाही सामन्यात पराभूत होऊन दिलं नाही.
टीम इंडियाने इंग्लंडला क्लिन स्वीप करत आपला विक्रम आणखी भक्कम केला आहे. टीम इंडियाची ही क्लिन स्वीपने विजय मिळवण्याची गेल्या 14 वर्षांतील 12 वी वेळ ठरली. न्यूझीलंड या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. न्यूझीलंडने 10 वेळा क्लिन स्वीपने विजय मिळवला आहे.
शुबमन गिल याने अबमदाबादमध्ये शतकी खेळी करत धमाका केला. शुबमन यासह वनडेमध्ये वेगवान 2 हजार 500 धावा करणारा फलंदाज ठरला. तसेच शुबमन सर्वात कमी डावांमध्ये 7 शतकं करणारा फलंदाज ठरला.
तसेच शुबमन गिल याने अहमदाबादमध्ये भन्नाट विक्रम केला आहे. शुबमन एकाच मैदानात तिन्ही फॉर्मेटमध्ये शतक करणारा पहिला भारतीय ठरला आहे. इतकंच नाही, शुबमनने आयपीएलमध्येही या मैदानात शतक केलंय.
विराटने या सामन्यात 52 धावांची खेळी केली. विराटने यासह आशियात 16 हजार आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण केल्या. विराटने याबाबतीत सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड ब्रेक केला. सचिनने 353 डावांमध्ये आशियात 16 हजार आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण केल्या. तर विराटने 340 डावांमध्ये ही कामगिरी करुन दाखवली.