रोहित शर्माने वनडे आणि कसोटी फॉर्मेटमधून निवृत्तीच्या बातम्यांवर सोडलं मौन, म्हणाला..

टी20 वर्ल्डकप विजयानंतर रोहित शर्माने टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आता रोहित शर्मा वनडे आणि टेस्ट सामने खेळताना दिसणार आहे. त्याच्या नेतृत्वात टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप खेळणार आहे. असं असताना या दोन्ही फॉर्मेटमधून निवृत्ती कधी घेणार? याबाबत रोहित शर्माने मौन सोडलं आहे.

रोहित शर्माने वनडे आणि कसोटी फॉर्मेटमधून निवृत्तीच्या बातम्यांवर सोडलं मौन, म्हणाला..
| Updated on: Jul 15, 2024 | 4:55 PM

टी20 वर्ल्डकप जेतेपदावर नाव कोरून रोहित शर्माने तमाम भारतीयांचं स्वप्न पूर्ण केलं. या विजयानंतर लगेचच रोहित शर्माने टी20 फॉर्मेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर बीसीसीआय सचिव जय शाह यांनी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणार हे स्पष्ट केलं. त्यामुळे 2025 या वर्षात रोहित शर्मा खेळणार यात शंका नाही. त्यानंतर रोहित शर्मा निवृत्त होईल अशी चर्चा रंगली आहे. असं असताना हिटमॅन रोहित शर्माने आपला रिटायरमेंट प्लान स्पष्ट केला आहे. 14 जुलैला डलासमध्ये एका कार्यक्रमात रोहित शर्माला वनडे आणि टेस्टमधून निवृत्तीबाबत प्रश्न विचारला गेला. तेव्हा रोहित शर्माने सांगितलं की, “फार पुढचा विचार करत नाही. पण आता चाहते त्याला खूप सारं खेळताना पाहतील.” अजून खूप सारं क्रिकेट बाकी असल्याचंही देखील रोहित शर्माने अधोरेखित केलं. रोहित शर्माचं हे उत्तर ऐकून उपस्थित टाळ्या वाजवून त्याच्या निर्णयाचं कौतुक केलं.

रोहित शर्माचं सध्याचं वक्तव्य सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. आजपासून तीन वर्षांनी होणाऱ्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेवर त्याचं लक्ष आहे, असं चाहत्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे या स्पर्धेसाठी रोहित शर्मा स्वत:ला फिट अँड फाईन ठेवेल, अशी अपेक्षा चाहत्यांची आहे. जर चॅम्पियन्स ट्रॉफी आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकली तर नक्कीच रोहित शर्माच्या नावाचा पुढे विचार होऊ शकतो. कारण त्यानंतर दोनच वर्षात वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धा होणार आहे. त्यामुळे पुढच्या दोन स्पर्धांवर रोहितचं पुढचं करिअर अवलंबून असल्याचं चाहत्यांचं म्हणणं आहे.

टी20 वर्ल्डकप 2021 स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीनंतर बीसीसीआयने कर्णधारपदाची धुरा रोहित शर्माच्या खांद्यावर दिली होती. मात्र रोहित शर्माच्या कर्णधारपदात टीम इंडियाला अपयशाच्या पायऱ्या चढाव्या लागल्या. यात टी20 वर्ल्डकप 2022, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप, वनडे वर्ल्डकपचा समावेश आहे. मात्र 2024 टी20 वर्ल्डकप स्पर्धेत रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने चांगली कामगिरी केली आणि दुसऱ्यांदा जेतेपदावर नाव कोरलं.