मंत्री संजय शिरसाट ॲक्शन मोडमध्ये, नागपूरमधील हॉस्टेलवर टाकली धाड, नेमकं कारण काय?
Sanjay Shirsat : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट हिवाळी अधिवेशनासाठी नागपूरात दाखल झाले आहेत. आज त्यांनी एका हॉस्टेलवर धाड टाकली. याबाबत माहिती जाणून घेऊयात.

राज्य सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला उपराजधानी नागपूरमधे सुरूवात झाली आहे. या अधिवेशनासाठी राज्य सरकारचे सर्व मंत्री आणि आमदार नागपूरात दाखल झाले आहेत. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट हेही अधिवेशनासाठी नागपूरात दाखल झाले आहेत. अशातच आज त्यांनी नागपूरमधील एका हॉस्टेलवर धाड टाकली. यावेळी त्यांच्यासोबत काही अधिकारीही होते. हॉस्टेलमध्ये कोणत्या सोयी सुविधा मिळणार आहेत याची त्यांनी चौकशी केली. तसेच अधिकाऱ्यांशीही चर्चा केली. यानंतर बोलताना मंत्री शिरसाट काय म्हणाले ते जाणून घेऊयात.
मंत्री संजय शिरसाट यांच्याकडून कामाची पाहणी
नागपूरमध्ये अनाथ मुलांच्या हॉस्टेलचे काम सुरु आहे, ते वेळेवर सुरु झालेले नाही. या ठिकाणी 1500 मुलांच्या राहण्याची सोय करण्यात येणार आहे. याठिकाणी संजय शिरसाट यांनी भेट दिली. यानंतर बोलताना मंत्री शिरसाट म्हणाले की, आमचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. समाजकल्याण खात्याचे राज्यातील हे सर्वात जास्त क्षमता असलेले हॉस्टेल असणार आहे.
2 वर्षात काम पूर्ण होणार
पुढे बोलताना शिरसाट म्हणाले की, दोन टप्प्यात या हॉस्टेलचे काम केले जात आहे, पहिल्या टप्प्यातील काम जवळपास पूर्ण झालेले आहे. मात्र यासाठी अजूनही वेळ लागेल. तसेच याचे काम पूर्ण होण्यासाठी 2 वर्षे लागतील. या ठिकाणी 1466 मुलांचा राहण्याची सोय होणार आहे. नव्या पीढीसाठी फायदेशीर ठरेल असे हे हॉस्टेल असणार आहे. मी त्यांना या कामासाठी 76 कोटी रुपयांचा निधी दिलेला आहे. यासाठी टेंडर निघालेलं आहे. महिनाभरात काम सुरू होईल. या कामात कोणत्याही प्रकारे कमतरता राहणार नाही यावर लक्ष ठेवण्यात येईल.
गरीब मुलांसाठी हॉस्टेल चालवली जातात
दरम्यान, समाज कल्याण विभागामार्फत राज्यातील विविध ठिकाणी हॉस्टेल चालवली जातात. याद्वारे मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बळ आणि वंचित विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी माफक दरात निवारा दिला जातो. या हॉस्टेलमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी MahaEschol पोर्टलवर अर्ज करावा लागतो. विद्यार्थ्यांचे उत्पन्न, जात आणि शैक्षणिक वर्गवारीनुसार निकष ठरलेले असतात. गुणवत्तेनुसार आणि उपलब्ध जागांनुसार निवड होते. हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, मॅट्रिकपूर्व/मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, फ्रीशिप यांसारख्या योजनांचा लाभ दिला जातो.
