मोठी बातमी! शिवसेना शिंदे गटाचे 22 आमदार भाजपच्या गळाला? फडणवीसांनी सगळंच सांगून टाकलं
शिवसेना शिंदे गटाचे 22 आमदार भाजपच्या गळाला लागले आहेत, असा मोठा दावा आदित्य ठाकरे यांच्याकडून करण्यात आला आहे, त्यानंतर आता यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये सध्या जोरदार इनकमिंग सुरू असल्याचं पहायला मिळत आहे, याचा फटका हा सर्वच पक्षांना बसला आहे, मात्र सर्वाधिक फटका हा शिवसेना शिंदे गटाला बसला आहे, शिवसेना शिंदे गटातून सध्या भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे. अनेक पदाधिकारी आणि नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे शिवसेना शिंदे गट महायुतीमध्ये नाराज असल्याचं बोललं जात आहे. शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार घातल्याचं देखील पाहायला मिळालं होतं. दरम्यान त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती, या भेटीची देखील जोरदार चर्चा रंगली.
त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून मोठा दावा करण्यात आला आहे. शिवसेना शिंदे गटाचे 22 आमदार भाजपच्या गळाला लागल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आदित्य ठाकरे यांच्या या दाव्यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार पलटवार केला आहे. जर असं म्हटलं तर उद्या कोणही म्हणू शकेल की आदित्य ठाकरेंचे वीस आमदार आहेत, ते ही भाजपच्या गळाला लागले आहेत. असं कोणाच्या म्हणण्याने थोडच काही होतं, असं यावेळी देवेंद्र फडणीस यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले फडणवीस?
‘ जर असं म्हटलं तर उद्या कोणीही म्हणू शकेल की आदित्य ठाकरेंचे वीस आमदार आहेत, ते ही भाजपच्या गळाला लागले आहेत. असं कोणाच्या म्हणण्याने थोडंच काही होतं? आणि आम्हाला शिंदे सेनेचे आमदार आमच्याकडे घेऊन करायचं काय आहे? ते आमचेच आहेत. शिंदे सेना जी आहे तो आमचा मित्र पक्ष आहे, ती खरी शिवसेना आहे. त्यामुळे आम्हाला त्यांचे आमदार घेऊन काय करायचं आहे, आम्ही अशा प्रकारचं राजकारण करत नाही. उलट शिवसेना मजबूत झाली पाहिजे, त्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. आणि निश्चितपणे भविष्यात शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि आमची महायुती अजून मजबूत होताना पहायला मिळेल, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
