Explainer : टी20 वर्ल्डकप 2024 साठी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच! का आणि कसा असेल प्लान जाणून घ्या

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेनंतर टीम इंडियाच्या गोटात बरीच खलबतं रंगली आहेत. रोहित शर्मा आणि विराट कोहली व्हाईट बॉल क्रिकेट खेळणार नाही अशीही चर्चा आहे. पण टी20 वर्ल्डकप 2024 साठी टीम इंडियाचं नेतृत्व रोहित शर्माकडे सोपवलं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सोशल मीडियावरही रोहित शर्माच्या नावाची चर्चा आहे.

Explainer : टी20 वर्ल्डकप 2024 साठी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच! का आणि कसा असेल प्लान जाणून घ्या
| Updated on: Nov 30, 2023 | 7:49 PM

मुंबई : वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेचं दु:ख मागे सारून आता टीम इंडियाची पुढच्या दिशेने वाटचाल सुरु झाली आहे. टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धा अवघ्या सहा महिन्यावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे आतापासून टीम इंडियाची बांधणी केली जात आहे. बीसीसीआयने प्रशिक्षक राहुल द्रविड आणि सपोर्ट स्टाफचा कार्यकाळ वाढवला आहे. त्यामुळे टी20 वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाची धुरा कोणाकडे असेल याची चर्चा रंगली आहे. टी20 वर्ल्डकपच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळण्यासाठी रोहित शर्माची मनधरणी सुरु आहे. दुसरीकडे, रोहित शर्मा कर्णधारपदाची धुरा सांभाळणार असं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून रोहित शर्मा याच्याकडे दक्षिण अफ्रिका टी20 मालिकेचं कर्णधारपद सोपवण्यात येणार असल्याची माहिती आहे. हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त असल्याने रोहित शर्मा याला पसंती दिली आहे. पण आता टी20 वर्ल्डकप 2024 पर्यंत रोहित शर्माकडेच सूत्र असतील असं सांगण्यात येत आहे.

रोहित शर्माकडे टी20 टीम कर्णधारपद का?

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत रोहित शर्माची बॅट चांगलीच तळपली होती. उत्तुंग षटकार तसेच चौकारांची फटकेबाजी करत टीम इंडियाला चांगली सुरुवात करून दिली होती. त्यामुळे टीम इंडियावरील दबाव कमी झाल्याचं पाहिलं गेलं आहे. तसेच प्रशिक्षक राहुल द्रविड आणि रोहित शर्मा यांच्यात चांगली ट्युनिंग असल्याचं दिसून आलं आहे. तसेच खेळाडूंसोबत त्याचं वागणं खेळीमेळीचं असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे टी20 वर्ल्डकप 2024 साठी रोहित शर्माकडेच सूत्र सोपवली जाणार असल्याची माहिती आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया टी20 वर्ल्डकप 2022 स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत पोहोचला होता. पण इंग्लंडकडून पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. त्यानंतर आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने पराभूत केलं होतं. वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत टीम इंडियाने चमकदार कामगिरी केली. अंतिम फेरीपर्यंत एकही सामना गमवला नव्हता. पण दुर्देवाने येथेही ऑस्ट्रेलियाने पराभूत करत टीम इंडियाचं स्वप्नभंग केला होता. पण आता टी20 वर्ल्डकप सहा महिन्यांवर असल्याने रोहित शर्माच योग्य नेतृत्व करू शकतो असं सांगण्यात येत आहे.

टीम इंडिया 3 वनडे, 3 टी20 आणि 2 कसोटी सामन्यांसाठी दक्षिण अफ्रिका दौरा करणार आहे. या दौऱ्यात टी20 संघाचं नेतृत्व रोहित शर्माकडे सोपणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. पण त्याला अजून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. जर रोहित शर्माकडे या दौऱ्यात टी20 चं नेतृत्व सोपवलं तर टी20 वर्ल्डकप 2024 साठीही त्याचंच नाव असेल, यात शंका नाही. सहा महिन्यांआधी जोखिम घेणं परवडणारं नाही हे देखील तितकंच खरं आहे.

टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धा अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे होणार आहे. ही स्पर्धा 3 जून ते 30 जून दरम्यान होणार आहे. या स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी होणार आहेत. 20 संघांच्या नावाची घोषणा झाली असून पाच संघांचा एक गट असेल. प्रत्येक गटातील टॉप 2 संघ सुपर आठ मध्ये एन्ट्री मारतील. प्रत्येकी 4 संघांचे दोन गट पडतील. यातून टॉपचे दोन संघ उपांत्य फेरी गाठतील. वेस्ट इंडिज, यूएसए, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, नेदरलँड, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश, आयर्लंड, स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनी, कॅनडा, नेपाळ, ओमान, नामिबिया, युगांडा हे संघ पात्र ठरले आहेत.