
रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय पातळीवर फक्त वनडे क्रिकेट सामने खेळणार आहे. कारण टी20 आणि कसोटी संघातून त्याने निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे रोहित शर्मा मैदानात कधी उतरेल याची उत्सुकता आहे. कारण चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर रोहित शर्मा एकही सामना खेळलेला नाही. त्यामुळे रोहित शर्माचे चाहते त्याची खेळी पाहण्यासाठी उत्सुक आहे. पण चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर एकही वनडे मालिका किंवा सामना झालेला नाही. बांगलादेशविरुद्धचा नियोजित दौरा रद्द झाल्यानंतर ही प्रतीक्षा लांबली. टीम इंडिया 19 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या मालिकेत वनडे संघाची धुरा रोहित शर्माच्या खांद्यावर असणार आहे. कारण अद्याप तो त्या पदावरून पायउतार झाला नाही. पण रोहित शर्माने या दौऱ्यापूर्वी एका मालिकेत भाग घेण्याची इच्छा वर्तवली आहे. ही मालिका कानपूरमध्ये खेळली जाणार आहे. या मालिकेत रोहित शर्मा चांगली कामगिरी करण्याच्या प्रयत्नात आहे.
रेव्हस्पोर्ट्सच्या बातमीनुसार, रोहित शर्माने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी आस्ट्रेलिया ए विरूद्ध 30 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबरदरम्यान अनऑफिशियल वनडे मालिका खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ऑस्ट्रेलिया ए टीम भारत ए विरुद्ध दोन कसोटी सामने आणि तीन वनडे साने खेळणार आहे. वनडे सामने कानपूरमध्ये होणार आहे. रिपोर्टनुसार, रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया ए विरुद्ध तीन सामने खेळू इच्छित आहे. कारण या मालिकेतून त्याची चांगली तयारी होऊ शकते. त्यानंतर टीम इंडियाचा दौरा 19 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. भारतीय संघ या मालिकेत 3 वनडे आणि 5 टी20 सामने खेळणार आहे. या वनडे मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना संघात सहभागी केलं जाण्याची शक्यता आहे.
रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआय रोहितला एकदिवसीय संघात स्थान मिळविण्याच्या शर्यतीत राहण्यासाठी डिसेंबर 2025 पासून सुरू होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळण्यास सांगू शकते. रोहित शर्माची वनडे क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी राहिली आहे. रोहित शर्मा आतापर्यंत 273 वनडे सामने खेळला आहे. त्याने 265 डावात 48.76 च्या सरासरीने 11168 धावा केल्या आहेत. यात त्याने 32 शतकं आणि 58 अर्धशतकं ठोकली आहे. त्याची सर्वोत्तम धावसंख्या ही 264 इतकी आहे.