रोहित शर्माच्या नेतृत्वात पटकावली चॅम्पियन्स ट्रॉफी, आता दिग्गज खेळाडूच्या नेतृत्त्वात खेळण्यास सज्ज

रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाची विजयी घोडदौड सुरु आहे. मागच्या दहा महिन्यात भारताला दोन आयसीसी स्पर्धा जिंकून दिल्या. पण निवृत्त होणार नाही हे स्पष्ट केलं आहे. आता काही आठवडे कर्णधारपदापासून दूर होत एक खेळाडू म्हणून खेळावं लागणार आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वात पटकावली चॅम्पियन्स ट्रॉफी, आता दिग्गज खेळाडूच्या नेतृत्त्वात खेळण्यास सज्ज
Image Credit source: Alex Davidson-ICC/ICC via Getty Images
| Updated on: Mar 11, 2025 | 3:52 PM

कर्णधार रोहित शर्माने टीम इंडियाच्या चाहत्यांना दिलेला शब्द पाळला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करू असं त्याने सांगितलं होतं. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने हा शब्द खरा करून दाखवला आहे. 9 मार्चला अंतिम फेरीत न्यूझीलंडचा 4 विकेट आणि 6 चेंडू राखून धुव्वा उडवला आणि जेतेपदावर नाव कोरलं. भारताची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची ही तिसरी वेळ आहे. त्यामुळे सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे. पण पुढचे काही आठवडे रोहित शर्मा एक खेळाडू म्हणून मैदानात उतरणार आहे. आपल्या संघातील स्टार खेळाडूच्या नेतृत्वात मैदानात उतरणार आहे. म्हणजेच पुढचे काही दिवस रोहित शर्मा एका खेळाडूच्या भूमिकेत मैदानात असणार आहे. रोहित शर्मा कर्णधारपद सोडणार का? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर तसं अजिबात नाही. रोहित शर्मा टीम इंडियाचा कर्णधार असणार यात काही शंका नाही. पण आयपीएलच्या पर्वात रोहित शर्माला एक खेळाडू म्हणून उतरावं लागेल. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सकडून मैदानात उतरणार आहे.

आयपीएलच्या 18व्या पर्वाचा अर्थात 2025 स्पर्धेचा थरार दोन महिने चालणार आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात रोहित शर्मा मैदानात उतरणार आहे. 2024 साली रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून ते हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आलं होतं. त्यावेळेस खूपच वाद झाला होता. इतकंच काय तर हार्दिकच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सची कामगिरी निराशाजनक राहिली होती. दुसरीकडे, रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने टी20 वर्ल्डकप जिंकला होता. आयपीएल 2025 स्पर्धेत मुंबई इंडियन्सचा पहिला सामना हा 23 मार्चला चेन्नई सुपर किंग्सशी होणार आहे.

दुसरीकडे, चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेनंतर रोहित शर्मा वनडे क्रिकेट संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होईल अशी चर्चा होती. पण रोहित शर्माने स्वत: या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. त्याने स्पष्ट केल्याने वनडे आणि कसोटी संघात खेळणार हे निश्चित आहे. पण कर्णधारपदावर कायम राहिल की नाही या बाबत अजूनतरी काय स्पष्टता नाही. टीम इंडिया जून 2025 मध्ये इंग्लंड दौऱ्यावर कसोटी मालिका खेळण्यासाठी जाणार आहे. या दौऱ्यात रोहितच्या खांद्यावरच धुरा राहते की नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.