चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर नव्या सेंट्रल काँट्रॅक्टची घोषणा, पाच खेळाडूंना दाखवला बाहेरचा रस्ता
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धा संपताना क्रिकेट संघांमध्ये उलथापालथ पाहायला मिळत आहे. एका क्रिकेट बोर्डाने सेंट्रल काँट्रॅक्टमध्ये बदल केला आहे. जवळपास 22 खेळाडूंना सेंट्रल काँट्रॅक्टमध्ये स्थान दिलं आहे. तर फक्त एकाच खेळाडूची ग्रेड ए प्लसमध्ये निवड केली आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा संपताच बांगलादेश क्रिकेट बोर्डाने सेंट्रल काँट्रॅक्टमध्ये उलथापालथ केली आहे.बांगलादेश क्रिकेट बोर्डाने 2025 सालासाठी केंद्रीय करार जाहीर केला आहे. बांगलादेश बोर्डाने खेळाडूंना ग्रेडच्या आधारावर मासिक वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे. बांगलादेशचं स्पर्धेतील आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आलं होतं. भारत आणि न्यूझीलंडकडून पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. तर पाकिस्तानविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला होता. असं असताना क्रिकेट बोर्डाने नव्या सेंट्रल काँट्रॅक्टमधून पाच खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. तसेच 22 खेळाडूंना सेंट्रल काँट्रॅक्टमध्ये स्थान दिलं आहे. तसेच पाच वेगवेगळ्या ग्रेडमध्ये खेळाडूंची विभागणी केली आहे. विशेष म्हणजे एकाच खेळाडूला ग्रेड ए+ मध्ये स्थान मिळालं आहे. तर ग्रेड ए मध्ये चार खेळाडूंना सहभागी केलं आहे.
स्टार वेगवान गोलंदाज तस्किन अहमद हा ग्रेड ए+ मध्ये असलेला एकमेव खेळाडू आहे. त्याला या वर्षी दरमहा 10 लाख बांगलादेशी टाका म्हणजेच अंदाजे 7 लाख 20 हजार रुपये मिळतील. तर नझमुल हुसेन शांतो, मेहदी हसन मिराज आणि लिटन दास यांना ग्रेड ए मध्ये स्थान देण्यात आले आहे. या खेळाडूंना दरमहा अंदाजे 5 लाख 75 हजार रुपये दिले जातील.
मोमिनुल हक, तैजुल इस्लाम, मुशफिकुर रहीम, मुस्तफिजुर रहमान, तौहिद हृदयॉय, हसन महमूद, नाहिद राणा यांना ग्रेड बी मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. या खेळाडूंना दरमहा अंदाजे 4 लाख 31 हजार रुपये दिले जातील. दुसरीकडे, ग्रेड सी मध्ये शादमान इस्लाम, सौम्या सरकार, जकार अली, तन्जीद हसन, शोरीफुल इस्लाम, रिशाद हुसेन, तन्जीम हसन आणि मेहेदी हसन यांचा समावेश आहे. नसुम अहमद आणि खालिद अहमद यांना ग्रेड डी मध्ये स्थान देण्यात आले आहे. या खेळाडूंचा करार हा तीन वर्षांसाठी असणार आहे.
दुसरीकडे, पाच खेळाडूंना नवीन केंद्रीय करारातून वगळले आहे. शाकिब अल हसन, झाकीर हसन, महमूदुल हसन जॉय, नईम हसन आणि नुरुल हसन हे पाच खेळाडू आहेत. हे खेळाडू केंद्रीय करारात होते. शाकिब अल हसन गेल्या वर्षीच कसोटी आणि टी20 मधून निवृत्त झाला आहे.. इतकंच काय तर एकदिवसीय संघात स्थान देण्यात आलेले नाही.
