बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान, बुमराह-मंधानाचा सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून गौरव

बीसीसीआयच्या नमन पुरस्कार सोहळ्यात सचिन तेंडुलकरचा कर्नल सीके नायडू जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. मुंबईच्या बीसीसीआयच्या मुख्यालयात हा सोहळा पार पडला. जसप्रीत बुमराह आणि स्मृती मंधाना यांना सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळाला. तर रविचंद्रन अश्विनचा विशेष पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान, बुमराह-मंधानाचा सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून गौरव
Image Credit source: video grab
| Updated on: Feb 01, 2025 | 9:22 PM

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला कर्नल सीके नायडू जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान केला. सचिन तेंडुलकरने हा पुरस्कार स्वीकारताना बीसीसीआयचे आभार मानले. तसेच बीसीसीआय काय खेळाडूंना पाठिंबा देत असते असे गौरवोद्गारही काढले. यावेळी त्याने जुन्या आठवणींना उजाळा दिला. ‘1989 मध्ये मी 16 वर्षांचा होतो. आज जेव्हा अश्विनने जेव्हा सर म्हंटलं तेव्हा मला वयाची जाणीव झाली. सुरुवातीच्या सामन्यातच कपिल पाजींनी मला उशीर करू नको असं सांगितलं होतं. तेव्हापासून मी माझं घड्याळ 7-8 मिनिटे पुढे ठेवतो. जेणेकरून मी कुठेही झोपू नये. त्यांनी सांगितलेलं माझ्या आजही लक्षात आहे.’ असं सचिन तेंडुलकर पुरस्कार स्वीकारताना म्हणाला. ‘दोन वर्षे मी विना बॅट स्पॉन्सरचा खेळलो. मला तंबाखूच्या कंपन्या ऑफर करत होत्या. पण तेव्हा वडिलांनी सांगितलं होतं की विना कराराचा खेळ पण खराब कंपन्यांना सोबत घेऊ नकोस. तेव्हापासून मी माझा सर्व आनंद वडील आणि कुटुंबासोबत नक्कीच शेअर केला आहे.’

सचिन तेंडुलकरने आपल्या 24 वर्षांच्या क्रिकेट कारकि‍र्दीत अनेक विक्रमांना गवसणी घातली. यात त्याच्या नावावर मोठ्या विक्रमांची नोंद आहे. भविष्यात हे विक्रम मोडणं खूपच कठीण आहे. भारताचा आंतरराष्ट्रीय पातळीवर झेंडा रोवण्यात सचिन तेंडुलकरचा मोठा हात आहे.सचिन तेंडुलकरेने 16 व्या वर्षी पाकिस्तानविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर मागे वळून पाहिलं नाही. जवळपास दोन दशकं त्याने क्रीडारसिकांच्या मनावर राज्य केलं. त्याने वनडे आणि कसोटीत एकत्रितपणे 100 शतकांचा विक्रम केला आहे. इतकंच कायत सर्वाधिक 200 कसोटी खेळण्याचा मानही त्याने मिळवला आहे. वनडे सामन्यात त्याने 18426 धावा, तर कसोटीत 15921 धावा केल्या आहेत. तसेच फक्त एकच टी20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे.

बीसीसीआयने वार्षिक पुरस्कार सोहळ्यात मागच्या वर्षी चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सन्मान केला. यावेळी जसप्रीत बुमराह आणि स्मृती मंधाना यांना सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून सन्मान करण्यात आला. रविचंद्रन अश्विनला विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. सर्फराज खानला सर्वोत्कृष्ट मेन्स डेब्यू तर आशा शोभनाला सर्वोत्कृष्ट महिला डेब्यू पुरस्कार मिळाला. महिला क्रिकेटमध्ये मंधाना सर्वोत्तम फलंदाज आणि दीप्ती शर्मा सर्वोत्तम गोलंदाज ठरली. देशांतर्गत क्रिकेटमध्ये शशांक सिंगला सर्वोत्कृष्ट व्हाईट बॉल अष्टपैलू खेळाडू आणि तनुष कोटियनला रेड बॉल सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.