T20 WC 2026 : संजू सॅमसनचं टी20 वर्ल्डकप खेळण्याचं स्वप्न भंगलं! सराव सामन्यात झालं असं की…

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेपूर्वी टीम इंडियाचा सराव सामना दक्षिण अफ्रिकेविरुद्ध पार पडला. या सामन्यात टीम इंडियाच्या वर्ल्डकप स्पर्धेतील प्लेइंग 11 ची झलक दिसली. त्याला कारणही तसंच आहे.

T20 WC 2026 : संजू सॅमसनचं टी20 वर्ल्डकप खेळण्याचं स्वप्न भंगलं! सराव सामन्यात झालं असं की...
संजू सॅमसनचं टी20 वर्ल्डकप खेळण्याचं स्वप्न भंगलं, सराव सामन्यात झालं असं की...
Image Credit source: PTI
| Updated on: Feb 04, 2026 | 10:12 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेची रंगीत तालिम आता अंतिम टप्प्यात आली आहे. सराव सामन्यात भारत आणि दक्षिण अफ्रिका हे संघ आमनेसामने आले. सराव सामन्यात तशी प्लेइंग 11 वगैरे नसते. खेळाडूंना फलंदाजीसाठी गरजेनुसार पाठवलं जातं. पण या दरम्यान संजू सॅमसनच्या पदरी निराशा पडली. न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेत केलेली सुमार कामगिरी अंगलट आली. अभिषेक शर्मासोबत ओपनिंगला इशान किशनला पाठवलं गेलं. म्हणजेच इशान किशन हा संजूच्या तुलनेत पहिली पसंती ठरला आहे. त्याचा फॉर्म पाहता हा निर्णय योग्यच आहे. त्याने सराव सामन्यातही आपली धमक दाखवून दिली. त्यामुळे टी20 वर्ल्डकप स्पर्धेत प्लेइंग 11 मध्ये त्यांचं स्थान पक्क झालं आहे. इशानने 7 षटकार आणि 2 चौकार मारत 20 चेंडूत अर्धशतक ठोकलं.

सराव सामन्यात संजू सॅमसनला फलंदाजी मिळेल असं वाटलं होतं. पण त्याला काही संघाने मैदानात उतरवलं नाही. इशान किशन आणि अभिषेक शर्मा फलंदाजीला उतरले. अर्धशतक ठोकल्यानंतर इशान किशनला रिटायर्ड आऊट केलं. तिलक वर्मा उतरला आणि त्याने 19 चेंडूत 45 धावांची खेळी केली आणि बाद झाला. अभिषेक शर्माही 18 चेंडूत 24 धावा करून तंबूत परतला. चौथ्या क्रमांकावर सूर्यकुमार, पाचव्या क्रमांकावर अक्षर पटेल, सहाव्या क्रमांकावर रिंकु सिंह, सातव्या क्रमांकावर हार्दिक पांड्या उतरले. इतकंच काय तर एक चेंडू खेळण्यासाठी हार्षित राणाला संधी मिळाली. पण संजूला काही फलंदाजीला उतरवलं नाही. त्यामुळे या वेळेसही संजूला वर्ल्डकप बेंचवर बसून पाहावा लागणार असं क्रीडाप्रेमी म्हणत आहेत.

संजू सॅमसनने न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेत 9.2 च्या सरासरीने 46 धावा केल्या. त्यामुळे त्याला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळणार नाही हे तेव्हाच कळलं होतं. आता सराव सामन्यात त्याच्या मोहोर लागली आहे. इशान किशन फक्त ओपनिंगच करत नाही तर विकेटकीपिंगही करतो. त्यामुळे संजूला ही जबाबदारीही मिळणार नाही. दुसरीकडे, तिसऱ्या स्थानासाठी तिलक वर्माची एन्ट्री झाली आहे. त्यानेही सराव सामन्यात आपली ताकद दाखवून दिली आहे. त्यामुळे हे स्थानही संजूच्या हातून गेलं.