
धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय, अशीच स्थिती संजू सॅमसनच्या चाहत्यांची झाली आहे. खरं तर न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेत संजू सॅमसनला स्वत:ला सिद्ध करण्याची संधी होती. पण संजू सॅमसनची कामगिरी तिसऱ्या टी20 सामन्यात निराशाजनक राहिली. संजू सॅमसनकडून या सामन्यात चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. पण पहिल्याच चेंडूवर विकेट टाकली. त्यामुळे त्याच्या चाहत्यांचा भ्रमनिरास झाला. अशा खेळीनंतर त्याला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळणं कठीण होणार आहे. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 गडी गमवून 153 धावा केल्या आणि विजयासाठी 154 धावांचं आव्हान दिलं. या धावांचा पाठलाग करण्यासाठी संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा ही जोडी मैदानात उतरली. स्ट्राईकला संजू सॅमसन होता. पण मॅट हेन्रीच्या गोलंदाजीवर गोल्डन डकवर बाद झाला. हेन्रीच्या सीम चेंडूचा सामना करताना संजू चुकला आणि क्लिन बोल्ड झाला.
संजू सॅमसन धावा करणं तर सोडा मैदानात वेळही घालवू शकला नाही. यापूर्वी पहिल्या टी20 सामन्यात 7 चेंडूत फक्त 10 धावा केल्या. तर दुसऱ्या टी20 सामन्यात 6 धावा केल्या. तिसऱ्या सामन्यात खातही खोलू शकला नाही. त्यामुळे त्याच्या फॉर्मची चर्चा रंगली आहे. इतकंच काय तर संजू सॅमसनच्या नावावर नकोसे विक्रमही रचले गेले आहे. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्या चेंडूवर बाद होणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत सहभागी झाला आहे. यात केएल राहुल, पृथ्वी शॉ आणि रोहित शर्मा यांचं नाव आहे. इतकंच काय तर भारतासाठी सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणार फलंदाज यादीत दुसऱ्या स्थानावर आला आहे. त्याने 47 डावात 7 वेळा शून्यावर बाद झाला आहे. रोहित शर्मा 12 वेळा शून्यावर झाला आहे. विराट कोहली 7 वेळा, सूर्यकुमार 6वेळा, केएल राहुल 5 वेळा बाद झाला आहे.
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक असताना संजू सॅमसनचा फॉर्म चिंतेचा विषय ठरला आहे. संघ व्यवस्थापनाने त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत संधीही दिल्या. पण त्यात फेल गेला आहे. उलट इशान किशन त्याच्यापेक्षा उजवा ठरला आहे. त्यामुळे टी20 वर्ल्डकप स्पर्धेत संजू सॅमसनला बेंचवर बसायची वेळ आली तर आश्चर्य वाटायला नको. असं पण तिलक वर्माची एन्ट्री होणार आहे. त्यामुळे या दोघांपैकी एकाला बसावंच लागणार आहे.