
दक्षिण अफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला कसोटी सामना निर्णायक वळणावर आला आहे. तीन दिवसांचा खेळ संपला असून दक्षिण अफ्रिकेला विजयासाठी 226 धावांची गरज आहे. तर पाकिस्तानला 8 विकेट काढायच्या आहेत. दोन दिवसांचा खेळ शिल्लक असल्याने या सामन्याचा निकाल लागणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागून आहे. पाकिस्तानने पहिल्या डावात 378 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दक्षिण अफ्रिकेचा डाव 269 धावांवर आटोपला. पाकिस्तानकडे 109 धावांची आघाडी होती. या धावांसह पुढे खेळताना पाकिस्तानने दुसर्या डावात फक्त 167 धावा केल्या. दक्षिण अफ्रिकेसमोर विजयासाठी 276 धावांचं आव्हान दिलं आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा दक्षिण अफ्रिकेने 2 गडी गमवून 51 धावा केल्या आहे. आता चौथा दिवशीचा खेळ खूपच महत्त्वाचा असणार आहे. खऱ्या अर्थाने दक्षिण अफ्रिकन गोलंदाजाची कसोटी लागणार आहे. पण या तीन दिवसात 32 विकेट पडल्या. त्यापैकी 11 विकेट एकट्या दक्षिण अफ्रिकेच्या गोलंदाजाने घेतल्या आहेत.
दुसऱ्या डावात पाकिस्तानचा संघ मैदानात फलंदाजीसाठी आला तेव्हा धडाधड विकेट पडत गेल्या. या डावात एकाही फलंदाजाला 50 धावा करता आल्या नाहीत. यांचं कारण होता तो फिरकीपटू सेनुरन मुथुसामी.. फिरकीपटू मुथुसामीने पाकिस्तानच्या फलंदाजांचा सळो की पळो करून सोडलं. आपल्या फिरकीच्या तालावर त्याने त्यांना नाचवलं आहे. पहिल्या डावातही त्याने पाकिस्तानला बॅकफूटवर ढकललं होतं आणि आता दुसऱ्या डावातही कमाल केली. त्याच्या फिरकीमुळे पाकिस्तानचा दुसरा डाव फक्त 167 धावांवर आटोपला.
सेनुरन मुथुसामीने पहिल्या डावात 6 विकेट काढल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या डावात 17 षटकं टाकली आणि 57 धावा देत 5 गडी बाद केले. यावेळी त्याने अब्दुल्ला शफीक, सउद शकील, सलमान आघा, शाहीन शाह आफ्रिदी आणि नोमान अलीला चालतं केलं. यासह मुथुसामीने या सामन्यात एकूण 11 विकेट घेतल्या. त्याने कसोटी कारकिर्दीत पहिल्यांदाच एकाच कसोटीत 10हून अधिक विकेट घेण्याचा कारनामा केला आहे. अशी कामगिरी करणारा दक्षिण अफ्रिकेचा चौथा फिरकीपटू आहे. यापूर्वी 2018 मध्ये केशव महाराजने असं केलं होतं. यापूर्वी ह्यूग टेफील्ड आणि पॉल एडम्सने असं केलं होतं.