
देशांतर्गत रणजी स्पर्धेत मुंबईकडून खेळणाऱ्या शार्दुल ठाकुरचा बोलबाला आहे. विजय हजारे स्पर्धेनंतर त्याने रणजी स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. रणजी स्पर्धेत मुंबई संघ अडचणीत असताना फलंदाजी आणि गोलंदाजीने संघाला सावरलं होतं. इतकंच काय हॅटट्रीक घेऊन सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. शार्दुल ठाकुर सध्या फॉर्मात असूनही त्याला टीम इंडियात जागा मिळाली नाही. त्यात आयपीएलमध्येही त्याला संघात घेण्यास कोणत्याही संघाने रूची दाखवली नाही. त्यामुळे शार्दुल ठाकुरच्या क्रिकेट कारकिर्दिला ग्रहण लागलं असं म्हणावं लागेल. असं निराशाजनक वातावरण असताना शार्दुल ठाकुरने मौन सोडलं आहे. जेव्हा तुम्ही घरी बसलेले असता तेव्हा निराशा तर येणारच, असं शार्दुल ठाकुरने सांगितलं आहे.
शार्दुल ठाकुरने पीटीआयशी बोलताना सांगितलं की, ‘जेव्हा तुम्हाला संघात जागा मिळत नाही तेव्हा निराशा येणार यात काही दुमत नाही. जेव्हा तुम्ही घरीच असेच बसून असता आणि याबाबत विचार करता तेव्हा वाईट वाटतं. पण जेव्हा कधी मी मैदानात उतरतो तेव्हा माझं लक्ष गहे त्या सामन्यावर असतं. पण ते क्लब क्रिकेट असो, रणजी ट्रॉफी, आयपीएल किंवा टीम इंडियासाठी खेळत असो. माझ्यासाठी सर्व सामने महत्त्वाचे आहेत. यामुळे कोणत्या स्तराचा सामना खेळतो याने काही फरक पडत नाही. मी कायम सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतो.’
शार्दुल ठाकुरला टीम इंडियात खेळण्याची संधी मिळेल की नाही याबाबतही चर्चा रंगली आहे. असं असताना शार्दुल ठाकुरने टीम इंडियात परतेन असा विश्वास व्यक्त केला आहे. ‘हो नक्कीच.. मला विश्वास आहे की टीममध्ये जागा मिळण्याचा दावेदार आहे. माझं पुढचं लक्ष्य हे संघात स्थान मिळवणं हेच आहे. ते कायमच माझं ध्येय राहिलं आहे.’ सध्या रणजी स्पर्धा संपल्यानंतर शार्दुल ठाकुर निवांत असणार आहे. कारण त्याला आयपीएलमध्ये कोणत्याही संघाने घेतलेलं नाही. पण इंग्लंड दौऱ्यात संधी मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे. या दौऱ्यापूर्वी काउंटी क्रिकेट खेळण्यासह तयार असल्याचं त्याने सांगितलं.