
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आतापर्यंत टीम इंडिया अपराजित राहिली आहे. एकही सामना न गमावता भारत चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पोहोचला आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानला पहिल्याच फेरीत बाहेर पडावं लागलं. आता येत्या 9 मार्चला दुबईत चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलचा महामुकाबला रंगणार आहे. टीम इंडिया आणि न्यूझिलंड आमने-सामने असणार आहेत. यापूर्वीच साखळी सामन्यामध्ये भारतानं न्यूझिलंडचा पराभव केला आहे. त्यानंतर उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव करत टीम इंडियानं चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल गाठली तर दुसरीकडे न्यूझिलंडनं उपांत्य फेरीत साउथ आफ्रिकेचा पराभव केला. दरम्यान फायनल सामन्यापूर्वीच चॅम्पियन्स ट्रॉफीबद्दल पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरने मोठी भविष्यवाणी केली आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनल सामन्याबद्दल बोलताना शोएब अख्तर यानं मोठं भाकित केलं आहे, तो एका युट्यूब चॅनलवर बोलत होता. सध्या भारतीय टीम ही खूपच चांगलं प्रदर्शन करत आहे. वर्तमान स्थितीबाबत बोलायचं झाल्यास सध्या मला टीम इंडियाचं पारडं न्यूझिलंडच्या तुलनेत जड दिसत आहे.’जर आम्ही टीम इंडियाची सध्याची कामगिरी पाहिली तर टीम इंडिया न्यूझिलंडपेक्षा कितीतरी पटीनं अधिक मजबूत दिसत आहे. त्यांची फलंदाजी आणि गोलंदाजी ही सध्या खूप प्रभावी वाटत असल्याचं अख्तरने म्हटलं आहे.
पुढे बोलताना अख्तरने म्हटलं की, भारताचा कर्णधार रोहित शर्मा हा न्यूझिलंडचा गोलंदाज मिचेल सॅटनरच्या विरोधात आक्रमक खेळू शकतो. रोहित शर्मा सुरुवाती पासूनच स्पिनरविरोधात आक्रमक खेळत आलेला आहे. त्यामुळे तो फायनलमध्ये देखील आक्रमक सुरुवात करेल असं मला वाटतं. त्यामुळे आता हे पाहावं लागेल की भारत आपला फॉर्म कायम ठेवतो की न्यूझिलंड उलटफेर करणार असं अख्तरने म्हटलं आहे.
भारताचं पारड जड
दरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत बोलायचं झाल्यास भारताचा आतापर्यंत एकदाही पराभव झालेला नाही. भारतानं आपले सर्व सामने जिंकत धडक्यात अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला आहे. तर दुसरीकडे न्यूझिलडने भारताविरोधात झालेला सामना गमावला होता. त्यामुळे फायनलमध्ये भारताचं पारडं जड माणण्यात येत आहे.