इंग्रज तशी चूक करणार नाहीत! इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तानी संघाला शोएब अख्तरने दाखवला आरसा
पाकिस्तान संघ वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे. तीन सामन्यांची कसोटी मालिका 19 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. पण इंग्लंड दौरा वाटतो तितका सोपा नाही असं सांगत शोएब अख्तरने कान टोचले.

पाकिस्तानचा संघ इंग्लंड दौऱ्यावर असून तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. 19 ऑगस्टपासून या मालिकेला सुरूवात होणार आहे. ही मालिका आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-2027 चा भाग आहे. पण दोन्ही संघांचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. असं असलं तरी दोन्ही संघांसाठी ही मालिका प्रतिष्ठेची असणार आहे. इंग्लंडच्या खेळपट्ट्यांवर पाकिस्तानचा इतिहास आव्हानात्मक राहिला आहे. पाकिस्तान कसोटी संघाचं नेतृत्व आता बाबर आझमच्या हातात आहे. त्याच्या नेतृत्वात पाकिस्तानने वेस्ट इंडिज मालिका 1-1 ने बरोबरीत सोडवली. दुसऱ्या कसोटीत मिळवलेला विजय हा पाकिस्तानचा 3 वर्षांतील पहिला परदेशी विजय होता. आता इंग्लंड दौऱ्यावर खऱ्या अर्थाने कस लागणार आहे. कारण इंग्लंडचा संघ अत्यंत आक्रमक क्रिकेट खेळण्यासाठी ओळखला जातो. त्यात आता जो रूटकडे नेतृत्व आलं आहे. त्यामुळे पाकिस्तानसाठी इंग्लंड दौरा एक कठीण पेपर असणार आहे.
काय म्हणाला शोएब अख्तर?
शोएब अख्तरने पाकिस्तानी संघाची पिसं काढत घरचा आहेर दिला आहे. इंग्लंडचा संघ वेस्ट इंडिजसारख्या चुका करणार नाही, असं शोएब अख्तर म्हणाला. ‘वेस्ट इंडिजने केलेल्या चुका इंग्लंड पुन्हा करणार नाही, त्यामुळे पाकिस्तानला सामना जिंकण्याची संधी मिळाली. इंग्लंड वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करतील, ज्याचा सामना करणे पाकिस्तानसाठी अत्यंत कठीण असणार आहे.’ पाकिस्तानने वेस्ट इंडिजमध्ये पहिला कसोटी सामना गमावला होता. त्यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यात 8 गडी राखून विजय मिळवला. त्यामुळे पाकिस्तानच्या वर्ल्ड टेस्ट रँकिंगमध्ये किंचितशी सुधारणा झाली असून वेस्ट इंडिजचा संघ तळाशी गेला आहे.
पाकिस्तानची इंग्लंडमधील कसोटी कामगिरी
पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात इंग्लंडच्या भूमीत 51 कसोटी सामने झाले आहेत. यात इंग्लंडने 21, तर पाकिस्तानने 11 सामन्यात विजय मिळवला आहे. तर 19 सामने अनिर्णित ठरले आहे. पाकिस्तानने इंग्लंडमध्ये आतापर्यंत खेळलेल्या 14कसोटी मालिकांपैकी फक्त 3 कसोटी मालिका जिंकल्या आहेत. 1987, 1992 आणि 1996 मध्ये कसोटी मालिका जिंकली आहे.
पाकिस्तान इंग्लंड कसोटी मालिकेचं वेळापत्रक
- पहिली कसोटी: 19 ते 23 ऑगस्ट 2026 – हेडिंग्ले, लीड्स
- दुसरी कसोटी: 27 ते 31 ऑगस्ट 2026 – लॉर्ड्स, लंडन
- तिसरी कसोटी: 9 ते 13 सप्टेंबर 2026 – एजबॅस्टन, बर्मिंग्हम