श्रेयस अय्यरला आयसीयुतून बाहेर काढण्याचा निर्णय, आई-वडील लवकरच सिडनीला होणार रवाना

गेल्या काही दिवसांपासून श्रेयस अय्यरच्या प्रकृतीची चिंता क्रीडाप्रेमींना लागून आहे. आयसीयूत भरती करावं लागल्याने चिंता आणखी वाढली होती. मात्र आता त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असून आयसीयूतून बाहेर काढलं आहे.

श्रेयस अय्यरला आयसीयुतून बाहेर काढण्याचा निर्णय, आई-वडील लवकरच सिडनीला होणार रवाना
श्रेयस अय्यरला आयसीयुतून बाहेर काढण्याचा निर्णय, आई-वडील लवकरच सिडनी होणार रवाना
Image Credit source: Mark Evans - CA/Cricket Australia via Getty Images
| Updated on: Oct 27, 2025 | 5:29 PM

टीम इंडियाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरच्या प्रकृतीबाबत सकाळपासून अपडेट येत आहे. त्यामुळे चाहत्यांची धाकधूक वाढत आहे. इतकंच काय तर कुटुंबिय देखील चिंताग्रस्त आहे. त्यामुळे श्रेयसच्या आई वडिलांनी थेट सिडनीला जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात श्रेयस अय्यरला आयसीयूत दाखल केल्याने नेमकं काय झालं आहे? याबाबत चर्चांना उधाण आलं आहे. असं असताना श्रेयस अय्यरबाबत एक चांगली बातमी समोर आली आहे. क्रिकबजच्या रिपोर्टनुसारस श्रेयस अय्यरच्या प्रकृतीत सुधारणा होत असून त्याला आयसीयुतून बाहेर काढलं आहे. बीसीसीआयने श्रेयसच्या प्रकृतीकडे लक्ष ठेवण्यासठी डॉक्टरांचं पथक नेमलं आहे. ते पथक निवासी डॉक्टरांसोबत श्रेयसच्या प्रकृतीची काळजी घेणार आहे. 31 वर्षीय श्रेयस अय्यरला कमीत कमी एक आठवडा सिडनी रुग्णालयात उपचार घ्यावे लागणार आहेत. संसर्गाचा धोका टाळण्यासाठी पुढील काही दिवस त्याला पूर्ण विश्रांतीची आवश्यकता आहे.

सिडनी येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यादरम्यान झेल पकडताना त्याच्या बरगडीला गंभीर दुखापत झाली होती.ड्रेसिंग रूममध्ये परतल्यानंतर त्याची प्रकृती आणखी बिकट झाली. वेदना असह्य झाल्या आणि टीम डॉक्टरांनी त्याला ताबडतोब रुग्णालयात पाठवले. त्याला तात्काळ रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांच्या मते त्याला अंतर्गत रक्तस्त्राव होत होता. भारतीय संघाचे डॉक्टर रिझवान खान त्याच्यासोबत आहे. इतकंच काय तर स्थानिक मित्रही त्याची काळजी घेत आहेत. श्रेयस अय्यरला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला नसता तर कदाचित काहीतरी विचित्र घडू शकलं असतं. त्याच्या जीवाला धोका निर्माण झाला असता.

दुसरीकडे, श्रेयसचे आई वडील लवकरच सिडनीसाठी रवाना होणार आहेत. व्हिसाबाबतची औपचारिकता पूर्ण झाली असून मुंबईतून सिडनीला रवाना होतील. वीकेंडमुळे श्रेयसचं कुटुंबीय व्हिसासाठी अर्ज करू शकले नव्हते. दरम्यान, श्रेयस अय्यर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेचा भाग नाही. पण श्रेयस अय्यरची सध्याची स्थिती पाहता दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळण्याची शक्यता कमीच आहे. कारण त्याला पूर्णपणे बरा होण्यासाठी चार ते सहा आठवडे लागू शकतात. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी त्याच्या खांद्यावर भारतीय संघाच्या उपकर्णधारपदाची धुरा होती.