टीम ‘ए’चं कर्णधारपद शुबमन गिलकडे! संघात कोणाला मिळालं स्थान ते वाचा

दुलीप ट्रॉफी स्पर्धेची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. श्रीलंका दौऱ्यानंतर भारताचा थेट सप्टेंबरमध्ये सामना होणार आहे. तत्पूर्वी दिग्गज खेळाडू देशांतर्गत क्रिकेट खेळताना दिसणार आहेत. दुलीप ट्रॉफीत टीम एची जबाबदारी शुबमन गिलकडे सोपवण्यात आली आहे. चला जाणून घेऊयात या संघात कोण कोण आहे ते

टीम एचं कर्णधारपद शुबमन गिलकडे! संघात कोणाला मिळालं स्थान ते वाचा
| Updated on: Aug 14, 2024 | 5:38 PM

दुलीप ट्रॉफीची कधी नव्हे ते इतकी चर्चा रंगली आहे. कारण बीसीसीआयने देशांतर्गत क्रिकेटला बळ देण्यासाठी दिग्गज क्रिकेटपटूंना दट्ट्या दिला होता. इतकंच काय तर श्रेयस अय्यर आणि इशान किशनने बीसीसीआयच्या सूचनेकडे कानाडोळा केल्याने फटका बसला आहे. त्यानंतर दिग्गज खेळाडूंचे चांगलेच धाबे दणाणले. त्यानंतर देशांतर्गत क्रिकेट खेळण्यासाठी दिग्गज खेळाडू सज्ज झाले. बीसीसीआयने बुधवारी दुलीप ट्रॉफी 2024-2024 स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यासाठी संघांची घोषणा केली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना दुलीप ट्रॉफीत आराम दिला गेला आहे. यापूर्वी हे दिग्गज खेळाडू देशांतर्गत क्रिकेट खेळणार असं सांगितलं होतं. मात्र आता ते या स्पर्धेत खेळणार नाही हे स्पष्ट आहे. दुलीप ट्रॉफी स्पर्धा 5 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. ही स्पर्धा अनंतपूर, आंध्र प्रदेश आणि एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये, बंगळुरु येथे होणार आहे. या स्पर्धेसाठी 4 संघांची घोषणा केली आहे. यात टीम ए, टीम बी, टीम सी आणि टीम डी असा संघ असेल.

संघात दिग्गज खेळाडूंचा भरणा असल्याने या स्पर्धेचं महत्त्व वाढलं आहे. दुलीप ट्रॉफी स्पर्धा देशातील कसोटी स्पर्धा म्हणून गणली जाते. मागच्या पर्वात साउथ झोनने वेस्ट झोनला पराभूत करत किताब जिंकला होता. साउथ झोनचा कर्णधार हनुमा विहारी होता. पण यावेळी स्पर्धेत झोनल संघ पद्धती काढून टाकण्यात आली आहे. त्याऐवजी संघाला ए, बी, सी, डी अशी नावं देण्यात आली आहेत. यावेळेस दुलीप ट्रॉफी स्पर्धा राउंड रॉबिन पद्धतीने खेळवली जाईल. म्हणजेच प्रत्येक संघ एकमेकांसमोर उभा ठाकणार आहे.

दुलीप ट्रॉफीसाठी टीम ए : शुबमन गिल (कर्णधार), मयंक अग्रवाल, रियान पराग, ध्रुव जुरेल, केएल राहुल, तिलक वर्मा, शिवम दुबे, तनुष कोटियन, कुलदीप यादव, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, खलील अहमद, आवेश खान, विदवथ कावरप्पा, कुमार कुशाग्र, शास्वत रावत.