
आशिया कप 2025 स्पर्धेसाठी अखेर टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून हा संघ कसा असेल याची खलबतं सुरु होती. त्यामुळे चर्चांना उधाण आलं होतं. कोणाला संघात स्थान मिळेल? कोणाला डावललं जाईल? याबाबत चर्चा रंगली होती. अखेर यावर पडदा पडला आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. शुबमन गिलचं टी20 संघात पुनरागमन झालं आहे. तसेच त्याच्या खांद्यावर उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे टी20 वर्ल्डकप 2026 नंतर त्याच्या खांद्यावर या फॉर्मेटच्या कर्णधारपदाची जबाबदारी पडेल असं आता क्रीडाप्रेमी सांगत आहे. टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी हाच संघ जवळपास असण्याची शक्यता आहे. कारण टी20 वर्ल्डकप स्पर्धा फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. या स्पर्धेसाठी फक्त 5 महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. त्यामुळे हाच संघ आता वर्ल्डकप स्पर्धेत खेळेल. यात फार तर एखाद दुसरा बदल होऊ शकतो. गिलने टीम इंडियासाठी 21 टी20 सामने खेळले आहेत. त्याने 30 च्या सरासरीने 578 धावा केल्या आहेत. गिल हा तिन्ही फॉरमॅटमध्ये आंतरराष्ट्रीय शतके झळकावणाऱ्या काही भारतीय फलंदाजांपैकी एक आहे.
शुबमन गिलची संघात निवड का करण्यात आली आहे? या प्रश्नावर आगरकर म्हणाला की, “त्याने आमच्या सर्व अपेक्षा ओलांडल्या आहेत.” 25 वर्षीय गिलने ऑगस्ट 2024 मध्ये श्रीलंका दौऱ्यावर टीम इंडियासाठी शेवटचा टी20 सामना खेळला होता. त्यानंतर फक्त कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट खेळत होता. पण चॅम्पियन्स ट्रॉफी, कसोटी क्रिकेट आणि आयपीएलमध्ये त्याचा सातत्यपूर्ण चांगला फॉर्म पाहून त्याला पुन्हा टी20 संघात स्थान मिळालं आहे. आशिया कप स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. भारताचा पहिला सामना 10 सप्टेंबरला होणार आहे. तर 14 सप्टेंंबरला पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानविरुद्ध सामना होणार आहे.
आशिया कप 2025 स्पर्धेसाठी टीम इंडिया : सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (विकेटकीपर), जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, संजू सॅमसन (विकेटकीपर), हर्षित राणा, रिंकू सिंग.