पृथ्वी शॉने टीम इंडियाचं दार ठोठावलं, महाराष्ट्राकडून खेळताच ठोकलं दमदार शतक
बुची बाबू स्पर्धेचा थरार सुरु असून दुसऱ्या दिवशी पृथ्वी शॉने शतकी खेळी केली. गेल्या काही दिवसापासून मोठ्या खेळीसाठी आतुर होता. कारण टीम इंडियात संधी मिळवायची असेल तर मोठी खेळी अपेक्षित होती. अखेर त्याला यात यश आलं आहे.

पृथ्वी शॉ हे नाव गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होतं. देशांतर्गत क्रिकेट असो की आयपीएल या स्पर्धेतून त्याचा पत्ता कट झाला होता. कारण त्याला सूर गवसत नव्हता. त्यात त्याच्या फिटनेसचा मुद्दा गाजला होता. त्याला रणजी स्पर्धेतून डावललं होतं. असं सर्व घडत असताना पृथ्वी शॉने मुंबईला सोडचिठ्ठी देत महाराष्ट्रकडून खेळण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय त्याच्या पथ्यावर पडला असंच म्हणावं लागेल. बुची बाबू स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी पृथ्वी शॉने शतकी खेळी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. महाराष्ट्राचा संघ अडचणीत असताना त्याची खेळी लक्षवेधी ठरली. त्याने 14 चौकार आणि एक षटकार मारत 122 चेंडूत शतक ठोकलं. त्याच्या शतकी खेळीनंतरही महाराष्ट्र संघ अडचणीत आहे. कारण फार काही धावा झालेल्या नाही. कारण महाराष्ट्राने सुरुवात चांगली केली पण 4 विकेट झटपट गमवल्या.
पृथ्वी शॉने पहिल्या विकेटसाठी सचिन धससोबत 71 धावांची भागीदारी केली. सचिन धस 10 धावा करून बाद झाला. सचिन बाद झाल्यानंतर 15 धावांच्या आत 3 गडी तंबूत गेल्या. महाराष्ट्राची 71 वर 1 विकेट अशी स्थिती होती. पण 84 धावांवर 4 विकेट तंबूत अशी स्थिती झाली. ऋतुराज गायकवाड 1, सिद्धेश वीर 4 आणि अंकित बावने खातं न खोलताच बाद झाला. पृथ्वी शॉ एका बाजूने खिंड लढवत होता. त्याला सिद्धार्थ म्हात्रेची साथ मिळाली. या दोघांनी चांगली खेळी केली आणि महाराष्ट्राचा स्कोअर 140 पार नेला. सिद्धार्थ 21 धावा करून बाद झाला. त्यामुळे महाराष्ट्राची 5 विकेट गमवून 143 अशी स्थिती झाली. अजूनही छत्तीसगडपेक्षा 109 धावांनी पिछाडीवर आहे.
पृथ्वी शॉने का सोडली मुंबईची साथ?
पृथ्वी शॉला जूनमध्ये टीम बदलण्यासाठी मुंबईकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळालं होतं. तेव्हा पृथ्वी शॉने सांगितलं होतं की, ‘माझ्या कारकिर्दीच्या या टप्प्यावर, मला विश्वास आहे की महाराष्ट्र संघात सामील झाल्यामुळे मला एक क्रिकेटपटू म्हणून आणखी वाढण्यास मदत होईल. गेल्या काही वर्षांत मला मिळालेल्या संधी आणि पाठिंब्याबद्दल मी मुंबई क्रिकेट असोसिएशनचा मनापासून आभारी आहे.’
