
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात रविवारी 9 फेब्रुवारीला शतक खेळी केली. इंग्लंडने विजयासाठी दिलेल्या 305 धावांचा पाठलाग करताना रोहितने 90 बॉलमध्ये 7 सिक्स आणि 12 फोरसह 119 रन्स केल्या. रोहितच्या या खेळीच्या जोरावर भारताने 44.3 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून हे विजयी आव्हान पूर्ण केलं. टीम इंडियाने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी एकतर्फी आघाडी घेतली. तर दुसऱ्या बाजूला शनिवारीच श्रीलंकेचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार दिमुथ करुणारत्ने ऐतिहासिक ‘शतक’ करुन निवृत्त झाला.
दिमुथने या सामन्याआधीच आपण निवृत्त होणार असल्याचं जाहीर केलं होतं. ऑस्ट्रेलियाविरुद्ध गॉलमध्ये होणारा दुसरा कसोटी सामना आपल्या कसोटी कारकीर्दीतील शेवटचा सामना असल्याचं दिमुथने जाहीर केलं होतं. दिमुथच्या कसोटी कारकीर्दीतील हा 100 वा सामना होता. आपल्या निरोप सामन्यात कारकीर्दीचा शेवट हा विजयाने व्हावा, अशी इच्छा प्रत्येक खेळाडूची असते. मात्र तसं होऊ शकलं नाही. श्रीलंकेचे खेळाडू दिमुथला विजयी निरोप देऊ शकले नाहीत. त्यामुळे श्रीलंकेच्या खेळाडूंना ही खंत कायम राहिल. दिमुथने अशाप्रकारे ऐतिहासिक शतकानंतर क्रिकेटला अलविदा केला.
श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 75 धावांचं माफक आव्हान दिलं होतं. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान 17.4 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून सहज पूर्ण केलं. ऑस्ट्रेलियाने यासह 2 सामन्यांच्या मालिकेत श्रीलंकेला 2-0 अशा फरकाने व्हाईटवॉश केला.
दिमुथला त्याच्या अखेरच्या सामन्यात अविस्मरणीय खेळी करण्यात अपयश आलं. दिमुथने या सामन्यातील पहिल्या डावात 36 आणि दुसऱ्या डावात 14 धावा केल्या. दिमुथने 17 नोव्हेंबर 2012 साली न्यूझीलंडविरुद्ध गॉलमध्ये कसोटी पदार्पण केलं होतं. दिमुथ याच मैदानातून निवृत्त झाला. दिमुथने या दरम्यानच्या काळात 100 कसोटी सामन्यांमधील 191 डावांमध्ये 16 शतकं आणि 39 अर्धशतकांसह 7 हजार 222 धावा केल्या. तसेच 2 विकेट्सही घेतल्या.
श्रीलंका प्लेइंग इलेव्हन: धनंजय डी सिल्वा (कर्णधार), पथुम निस्सांका, दिमुथ करुणारत्ने, दिनेश चांदीमल, अँजेलो मॅथ्यूज, कामिंदू मेंडिस, कुसल मेंडिस (विकेटकीपर), रमेश मेंडिस, प्रभात जयसूर्या, निशान पेरिस, लाहिरू कुमारा
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन: स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), उस्मान ख्वाजा, ट्रॅव्हिस हेड, मार्नस लाबुशेन, जोश इंग्लिस, अॅलेक्स केरी (विकेटकीपर), ब्यू वेबस्टर, कूपर कॉनोली, मिचेल स्टार्क, मॅथ्यू कुहनेमन आणि नॅथन लायन.