Test Cricket : रोहित-विराटसारखा तडकाफडकी नाही, दिग्गज फेयरवेल टेस्ट खेळून निवृत्त होणार, शेवटचा सामना खेळण्यासाठी सज्ज

Farewell Test Match : टीम इंडियाच्या आर अश्विन, रोहित शर्मा आणि विराट कोहली या तिघांनी कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्तीची घोषणा केली. त्यामुळे या तिघांना निरोप देता आला नाही. मात्र एक दिग्गज शेवटचा सामना खेळून निवृत्त होणार आहे. जाणून घ्या कोण आहे तो?

Test Cricket : रोहित-विराटसारखा तडकाफडकी नाही, दिग्गज फेयरवेल टेस्ट खेळून निवृत्त होणार, शेवटचा सामना खेळण्यासाठी सज्ज
Virat Kohli and Rohit Sharma Team India
Image Credit source: PTI
| Updated on: Jun 17, 2025 | 9:28 AM

ऑलराउंडर आर अश्विन, कॅप्टन रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहली टीम इंडियाच्या या अनुभवी त्रिकुटाने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. या तिघांनी गेल्या दशकभरात टीम इंडियासाठी निर्णायक भूमिका बजावली. मात्र या तिघांच्या निवृत्तीचा पॅटर्न सारखाच राहिला. या तिघांनीही तडकाफडकी निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे बीसीसीआयला आणि क्रिकेट चाहत्यांना या लाडक्या आणि दिग्गज खेळाडूंना निरोप देण्याची संधीही मिळाली नाही. मात्र आता एक असा खेळाडू आहे जो सांगून निवृत्त होत आहे. त्याने याबाबत महिन्याभराआधीच सांगितलंय. तसेच तो त्याच्या कारकीर्दीतील शेवटचा सामना खेळण्यासाठी सज्ज झाला आहे.

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळीला 17 जूनपासून सुरुवात होत आहे. श्रीलंका विरुद्ध बांगलादेश या मालिकेने साखळीची सुरुवात होत आहे. यजमान श्रीलंका बांगलादेश विरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. उभयसंघातील पहिला सामना हा 17 ते 21 जून दरम्यान गॉल आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम येथे खेळवण्यात येणार आहे. धनंजया डी सिल्वा याच्याकडे श्रीलंकेच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे. तर नजमुल हुसैन शांतो बांगलादेशच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे.

श्रीलंकेचा दिग्गज ऑलराउंडर अँजलो मॅथ्यूज याच्या कसोटी कारकीर्दीतील हा शेवटचा सामना असणार आहे. अँजलोने मे महिन्यात 23 तारखेला निवृत्तीची घोषणा केली होती. तसेच बांगलादेश विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर निवृत्त होणार असल्याचंही अँजलोने सांगितलं होतं. त्यामुळे श्रीलंका क्रिकेट टीमचा अँजलोला विजयी निरोप देण्याचा प्रयत्न असणार आहे.

अँजलो मॅथ्यूज याची कसोटी कारकीर्द

अँजलो मॅथ्यूज याने 118 कसोटी सामन्यांमध्ये श्रीलंकेचं प्रतिनिधित्व केलं आहे. अँजलोने 210 डावांमध्ये 44.63 च्या सरासरीने आणि 48.46 स्ट्राईक रेटने एकूण 8 हजार 167 धावा केल्या आहेत. अँजलोने या दरम्यान 1 द्विशतक, 16 शतकं आणि 45 अर्धशतकं झळकावली आहेत. तसेच अँजलोने 89 सिक्स आणि 831 फोर ठोकले आहेत. तसेच अँजलोने कसोटीतील 86 डावांमध्ये 33 विकेट्स मिळवल्या आहेत. अँजलोची 44 धावांच्या मोबदल्यात 4 विकेट्स ही कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे.

अँजलो मॅथ्यूज शेवटच्या कसोटी सामन्यासाठी सज्ज

अँजलो मॅथ्यूजची वनडे आणि टी 20iमधील कामगिरी

अँजलोने 226 वनडे आणि 90 टी 20i सामने खेळले आहेत. अँजलोने वनडे क्रिकेटमध्ये 5 हजार 916 रन्स केल्या आहेत. तसेच 126 विकेट्सही घेतल्या आहेत. अँजलोने टी 20iमध्ये 1 हजार 416 रन्स केल्या आहेत. तर 45 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आहे.