SMAT 2025 : केरळ विजयी घोडदौड रोखण्यात यशस्वी, सूर्या, शिवम-शार्दूल मुंबईला जिंकवण्यात अपयशी, 15 धावांनी पराभव

Smat Mumbai vs Kerala Match Result : केएम आसिफ याने धारदार बॉलिंग करत मुंबईच्या 5 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. केरळला मुंबई विरुद्ध विजय मिळवून देण्यात केएम आसिफ याने प्रमुख भूमिका बजावली.

SMAT 2025 : केरळ विजयी घोडदौड रोखण्यात यशस्वी, सूर्या, शिवम-शार्दूल मुंबईला जिंकवण्यात अपयशी, 15 धावांनी पराभव
Suryakumar Yadav Smat 2025
Image Credit source: @surya_14kumar x Account
Updated on: Dec 04, 2025 | 9:45 PM

संजू सॅमसन याच्या नेतृत्वात केरळ क्रिकेट टीम मुंबईची विजयी घोडदौड रोखण्यात यशस्वी ठरली आहे. शार्दूल ठाकुर याच्या नेतृत्वात मुंबई सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत अजिंक्य होती. मुंबईने सलग 4 सामने जिंकले होते. तर मुंबई 4 नोव्हेंबरला केरळ विरुद्ध सलग आणि एकूण पाचवा विजय मिळवण्यासाठी मैदानात उतरली होती. मात्र फलंदाज अपयशी ठरल्याने मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला. केरळने मुंबईवर 15 धावांनी मात केली. उभयसंघातील सामन्याचं आयोजन हे लखनौमध्ये करण्यात आलं होतं. केरळने मुंबईसमोर 178 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र केरळने मुंबईला 163 रन्सवर ऑलआऊट केलं.

मुंबईला हा सामना जिंकण्याची संधी होती. मात्र निर्णायक क्षणी सूर्यकुमार यादव याने निराशा केली. मुंबईला विजयासाठी 3 ओव्हरमध्ये 31 धावांची गरज असताना सूर्यकुमार यादव आऊट झाला. सूर्याची विकेट निर्णायक ठरली. मुंबईने इथेच सामना गमावला. त्यानतंर इतर फलंदाजांनी मुंबईच्या विजयासाठी प्रयत्न केले. मात्र ते प्रयत्न अपुरे पडले. केएम आसिफ याने केरळच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली. केएमने 10 बॉलमध्ये 5 विकेट्स सामनाच फिरवला आणि मुंबईच्या पराभवाची स्क्रिप्ट लिहीली.

सूर्याची निराशाजनक कामगिरी

सूर्या सातत्याने टी 20 क्रिकेटमध्ये मोठी धावसंख्या करण्यात अपयशी ठरला. सूर्याला केरळ विरुद्ध चांगली सुरुवात मिळाली. मात्र सूर्या गरजेनुसार गिअर बदलण्यात अपयशी ठरला. सूर्या 25 बॉलमध्ये 32 रन्स करुन आऊट झाला. सूर्याने या खेळीत 4 चौकार लगावले. केएम आसिफ याने सूर्याला आऊट केलं.

केएम आसिफने मुंबईच्या डावातील 18 व्या ओव्हरमध्ये सूर्या व्यतिरिक्त साईराज पाटील आणि शार्दूल ठाकुर या दोघांनाही आऊट केलं. त्यानंतर आसिफने 20 व्या ओव्हरमध्ये हार्दिक तामोरे आणि शम्स मुलानी या दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. आसिफने यासह 5 विकेट्स घेतल्या.

सर्फराज-अजिंक्यची खेळी व्यर्थ

मुंबईची विजयी धावांचा पाठलाग करताना काही खास सुरुवात राहिली नाही. आयुष म्हात्रे स्वस्तात आऊट झाला. त्यानंतर अजिंक्य रहाणे आणि सर्फराज खान या अनुभवी जोडीने मुंबईसाठी ठोस भागीदारी केली. या दोघांनी 80 धावांची भागीदारी केली. मात्र दोघेही आऊट झाल्यानंतर केरळने कमबॅक केलं. अजिंक्यने 32 तर सर्फराजने 52 धावा केल्या. मात्र सूर्या मैदानात असल्याने मुंबई जिंकेल, असा विश्वास चाहत्यांना होता. मात्र सूर्याने निराशा केली.

त्याआधी केरळसाठी कॅप्टन संजू सॅमसन याने सर्वाधिक 46 धावा केल्या. विष्णु विनोद याने 43 तर शराफुद्दीन याने 35 धावांचं योगदान दिलं. केरळने अशाप्रकारे 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 178 धावांपर्यंत मजल मारली.