गंभीर प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत असताना सौरव गांगुलीच्या पोस्टने उडाली खळबळ, नेमकं काय लिहिलं जाणून घ्या

टीम इंडियाच्या पुढच्या प्रशिक्षपदासाठी गौतम गंभीरच्या नावाची जोरदार चर्चा रंगली आहे. गौतम गंभीरचं नाव जवळपास निश्चित असल्याचंही बोललं जात आहे. असं असताना माजी क्रिकेटपटू सौरव गांगुलीच्या पोस्टने खळबळ उडाली आहे. सौरव गांगुलीचा इशारा नेमका कोणाकडे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

गंभीर प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत असताना सौरव गांगुलीच्या पोस्टने उडाली खळबळ, नेमकं काय लिहिलं जाणून घ्या
| Updated on: May 30, 2024 | 3:07 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेनंतर राहुल द्रविडचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपत आहे. त्यामुळे नव्या प्रशिक्षपदासाठी आतापासून शोधाशोध सुरु आहे. बीसीसीआयने यासाठी अर्जही मागवले आहेत. मात्र कोलकाता नाईट रायडर्सला जेतेपद मिळवून देणाऱ्या गौतम गंभीरचं नाव यात आघाडीवर आहे. आयपीएल 2024 स्पर्धेतील अंतिम सामना संपल्यानंतर गौतम गंभीर आणि बीसीसीआय सचिव जय शाह यांच्यात मैदानात चर्चा रंगली होती. त्यामुळे गौतम गंभीरचं नाव निश्चित असल्याचं बोललं जात आहे. पण बीसीसीआयने याबाबत काहीच सांगितलेलं नाही. टी20 वर्ल्डकप स्पर्धा संपताच टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकाच्या नावाची घोषणा होईल. तत्पूर्वी माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली याच्या ट्वीटने खळबळ उडाली आहे. सौरव गांगुलीच्या पोस्टचा रोख नेमका कोणाकडे? हे सांगणं कठीण आहे. पण गंभीरच्या नावाची जोरदार चर्चा असताना गांगुलीचं हे ट्वीट बरंच काही सांगून जात आहे. गौतम गंभीरच्या नावाला गांगुलीचा विरोध असल्याचं नेटकरी त्या पोस्टखाली सांगत आहेत. त्यामुळे सौरव गांगुलीच्या मनात नेमकं काय सुरु आहे याबाबत चर्चांना उधाण आलं आहे.

“माणसाच्या आयुष्यात प्रशिक्षकाचे महत्त्व खूप आहे. प्रशिक्षक मैदानावर आणि मैदानाबाहेर आपल्या मार्गदर्शनाने आणि सतत प्रशिक्षणाने कोणत्याही व्यक्तीचे भविष्य सुधारतो. त्यामुळे प्रशिक्षक आणि संस्थेची निवड अत्यंत हुशारीने करावी”, अशी पोस्ट सौरव गांगुलीने केली आहे. सौरव गांगुलीच्या पोस्टने पु्न्हा एकदा चर्चांना वेगळा फाटा फुटला आहे. सौरव गांगुलीचा गंभीरला विरोध असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे.

क्रिकेटपटू म्हणून गौतम गंभीरने भारताला दोनवेळा जेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. 2007 मध्ये पहिला टी20 वर्ल्डकप, त्यानंतर 2011 मध्ये वनडे वर्ल्डकप स्पर्धेतही त्याने चांगली खेळी केली होती. नव्या प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ हा साडे तीन वर्षांचा आहे. यात टी20 वर्ल्डकप, टेस्ट चॅम्पियनशिप आणि चॅम्पियन ट्रॉफीचा समावेश आहे. आता टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी कोण विराजमान होते? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. गौतम गंभीरला संधी मिळणार की आणखी कोण या पदावर विराजमान होणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.