SL vs PAK: चढ-उतारांनी भरलेल्या कसोटीत पाकिस्तानचा श्रीलंकेवर ऐतिहासिक विजय, अब्दुल्लाह शफीक हिरो

| Updated on: Jul 20, 2022 | 4:47 PM

पाकिस्तानने अब्दुल्लाह शफीकच्या (Abdullah shafique) शानदार शतकाच्या बळावर श्रीलंकेवर गॉल कसोटीत (Sri Lanka vs Pakistan, 1st Test)विजय मिळवला.

SL vs PAK: चढ-उतारांनी भरलेल्या कसोटीत पाकिस्तानचा श्रीलंकेवर ऐतिहासिक विजय, अब्दुल्लाह शफीक हिरो
abdullah shafique
Image Credit source: AFP
Follow us on

मुंबई: पाकिस्तानने अब्दुल्लाह शफीकच्या (Abdullah shafique) शानदार शतकाच्या बळावर श्रीलंकेवर गॉल कसोटीत (Sri Lanka vs Pakistan, 1st Test)विजय मिळवला. यजमान श्रीलंकेने पाहुण्या पाकिस्तानला विजयासाठी 343 धावांचं विशाल लक्ष्य दिलं होतं. पाकिस्तानने 6 विकेट गमावून हे लक्ष्य पार केलं. अब्दुल्लाह शफीक पाकिस्तानच्या विजयाचा हिरो ठरला. त्याने 160 धावा फटकावल्या. बाबर आजमने (Babar Azam) 55 आणि मोहम्मद रिजवानने 40 धावा दुसऱ्याडावात केल्या. पाकिस्तानचा संघ विजयापासून 19 धावा दूर असताना, श्रीलंकन खेळाडू कसुन रजीताने अब्दुलल्लाह शफीकचा सोपा झेल सोडला. त्यानंतर श्रीलंकेच्या विजयाच्या आशा संपुष्टात आल्या. या विजयासह पाकिस्तान कसोटी मालिकेत 1-0 ने पुढे आहे.

पाकिस्तानने इतिहास रचला

पाकिस्तानने श्रीलंकेविरुद्ध ऐतिहासिक विजय मिळवला. पहिल्यांदा गॉलच्या मैदानात चौथ्याडावात 300 पेक्षा जास्त धावांचा यशस्वी पाठलाग करण्यात आला. यावर्षी कसोटी क्रिकेट मध्ये मागच्या दीड महिन्यात पाचव्यांदा 250 पेक्षा जास्त धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करुन कसोटी मध्ये विजय मिळवला.

85 धावात 7 विकेट

अब्दुल्लाह शफीकच्या बळावर पाकिस्तानने कसोटी क्रिकेट मध्ये एक मोठ लक्ष्य साध्य केलं. महत्त्वाचं म्हणजे या कसोटीच्या पहिल्याडावात पाकिस्तानच्या संघाने अवघ्या 85 धावात 7 विकेट गमावल्या होत्या. पण बाबर आजमने झुंजार शतक झळकवून पाकिस्तानला श्रीलंकेच्या पहिल्या डावातील धावसंख्येच्या जवळ पोहोचवलं. त्यानंतर दुसऱ्याडावात अब्दुल्लाह शफीक स्टार बनला. पाकिस्तानने एक ऐतिहासिक विजय मिळवला.

अब्दुल्लाह शफीक सामनावीर

नाबाद 160 धावांची इनिंग खेळणाऱ्या अब्दुल्लाह शफीकला सामनावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. पुरस्कार स्वीकारल्यानंतर शफीक म्हणाला की, “नाबाद राहून संघाला विजय मिळवून दिल्याचा आनंद आहे. दुसऱ्याडावात पाकिस्तानी संघाने चांगली फलंदाजी केली. नव्या चेंडूने फिरकी गोलंदाज खेळणं थोडं अवघड होतं. पण आम्ही चांगले खेळलो”

अब्दुल्लाह शफीक दुसऱ्याडावात किती चेंडू खेळला?

अब्दुल्लाह शफीकने फक्त संघाला विजयच मिळवून दिला नाही, तर त्याने एक मोठा कारनामाही केला. शफीक चौथ्या डावात 408 चेंडू खेळला. अशी कामगिरी करणारा तो पाचवा फलंदाज आहे. कसोटी क्रिकेट मध्ये चौथ्या डावात 400 पेक्षा जास्त चेंडू फक्त सुनील गावस्कर, बाबर आजम, माइक आथर्टन आणि हर्बर्ट सटक्लिफच खेळले आहेत.