अजूनही विश्वास बसेना! रोहित शर्माने टी20 वर्ल्डकप जेतेपदानंतर व्यक्त केल्या भावना

टी20 वर्ल्डकप जेतेपद मिळवल्यानंतर संपूर्ण देशात आनंदाचं वातावरण आहे. प्रत्येक ठिकाणी या वर्ल्डकप जेतेपदाची चर्चा होत आहे. मात्र कर्णधार रोहित शर्माला यावर विश्वास बसत नाही. त्याला अजूनही हे एक स्वप्न असल्यासारखं वाटत आहे. वर्ल्डकप ट्रॉफीसोबत फोटोसेशन करताना त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या.

अजूनही विश्वास बसेना! रोहित शर्माने टी20 वर्ल्डकप जेतेपदानंतर व्यक्त केल्या भावना
Image Credit source: BCCI
| Updated on: Jul 02, 2024 | 4:14 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने दक्षिण अफ्रिकेला 7 धावांनी पराभूत केलं. टीम इंडियाने 11 वर्षानंतर आयसीसी जेतेपदावर नाव कोरलं आहे. या दरम्यान काही संधी चालून आल्या मात्र पदरी अपयश पडलं. अखेर हा दुष्काळ संपला असून कर्णधार रोहित शर्माने टी20 वर्ल्डकप ट्रॉफी उंचावली. या स्पर्धेत टीम इंडियाने एकही सामना गमावला नाही. गेल्या दहा वर्षांपासून मागे असलेलं पराभवाचं शुक्लकाष्ठ या निमित्ताने दूर झालं. या जेतेपदानंतर रोहित शर्माला अजूनही हे स्वप्नच असल्याचं वाटत आहे. “असं वाटते की हे घडलंच नाही. असं घडलं असलं तरी. पण अजूनही यावर विश्वास बसत नाही.” रोहित शर्माने बीसीसीआय टीव्हीशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या. चक्रि‍वादळाच्या संभाव्य धोका लक्षात घेता टीम इंडिया बारबाडोसमध्ये अडकली आहे. पण टीम इंडियांच्या कर्णधाराच्या मनातील वादळ काही शांत होताना दिसत नाही.

“मागची रात्र खरंच खूप आनंदात गेली. आम्ही पार सकाळपर्यंत आनंदोत्सव साजरा केला.” पीटीआयशी बोलताना रोहित शर्माने मन मोकळं केलं. “मी रात्रभर झोपलोच नाही पण मला अजूनही एकदम फ्रेश वाटत आहे. आता माझ्याकडे खूप वेळ असून निवांत झोप घेऊ शकतो.”, असं रोहित शर्माने सांगितलं. “मला विजयाचा प्रत्येक क्षण जगायचा आहे. प्रत्येक जाणाऱ्या क्षणासोबत आनंद लुटण्याचा प्रयत्न आहे.” 11 वर्षानंतर आयसीसी चषक जिंकल्याचा आनंद यावेळी रोहित शर्माने व्यक केला. “आम्ही हे स्वप्न गेल्या अनेक वर्षांपासून बाळगून होतो. आम्ही यासाठी खूप मेहनत घेतली आणि सत्यात उतरवलं. आता एकदम शांत वाटत आहे.”, असंही रोहित शर्मा पुढे म्हणाला.

रोहित शर्माच्या नेतृत्वात वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय संघ पोहोचला होता. मात्र ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला आणि स्वप्नांचा चुराडा झाला. पण सहा महिन्यातच टीम इंडियाने जेतेपदावर नाव कोरलं. रोहित शर्माने आपल्या कर्णधारपदाच्या काळात आक्रमकता दाखवली. आक्रमक फलंदाजी करून विरोधी संघांवर हावी होत होता. त्याचा फायदा टीम इंडियाला झाला. दुसरीकडे, रोहित शर्माने शेवटच्या चेंडूपर्यंत हार मानली नाही. मग तो पाकिस्तानविरुद्धचा सामना असो की दक्षिण अफ्रिकेविरुद्ध सामना..30 चेंडूत 30 धावांची आवश्यकता असूनही भारताने अंतिम सामना 7 धावांनी जिंकला.