क्रिकेटच्या देव तेंडुलकरबाबत सुशीला मीणाला काहीच माहिती नाही, पण असं असूनही…

सुशीला मीणा हे नाव सध्या सोशल मीडियावर चांगलंच गाजतंय. झहीर खानसारखी बॉलिंग शैली असल्याने प्रत्येकाने तिचं कौतुक केलं. पण तिच्यातील स्पार्क मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ओळखला आणि रातोरात ती स्टार झाली. पण असं असताना क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरबाबत तिला काहीच माहिती नाही.

क्रिकेटच्या देव तेंडुलकरबाबत सुशीला मीणाला काहीच माहिती नाही, पण असं असूनही...
| Updated on: Jan 07, 2025 | 5:06 PM

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला क्रिकेटप्रेमी देवाचा दर्जा देतात. सचिन तेंडुलकरची खेळी आणि रेकॉर्ड पाहता ही उपमा योग्यच आहे असं म्हणू शकतो. सचिन तेंडुलकरने क्रिकेट विश्वाला रामराम ठोकला आहे. मात्र आजही त्याची लोकप्रियता कायम आहे. त्याची बॅटिंग शैली पाहून आजही क्रिकेटर्संना प्रेरणा मिळत आहे. त्यामुळे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा क्रिकेटविश्वात एक वेगळंच वलय आहे. सचिन तेंडुलकरची पारख आणि निर्णय क्षमता याबाबत अनेकदा क्रिकेटर्संनी स्वत: सांगितलं आहे. त्यामुळे सचिनच्या पारखी नजरेत राजस्थानच्या क्रिकेटमधील हिरा सापडला आहे. हे नाव दुसरं तिसरं कोणी नसून सुशीला मीणा आहे. सचिनने तिच्या बॉलिंगचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आणि ती रातोरात स्टार झाली. पण रातोरात स्टार करणाऱ्या सचिनबाबत सुशीला मीणा अनभिज्ञ आहे. त्याची कारणंही वेगळी आहे. जेव्हा सुशीला मीणा हीला सचिन तेंडुलकरबाबत विचारलं गेलं,तेव्हा तिने सांगितलं की, ‘मी त्यांना ओळखत नाही. पण त्यांचे मनापासून आभार मानते.’

राजस्थानच्या प्रतापगड जिल्ह्यातल्या रामेर तालाब गावातली सुशीला मीणा ही 10 वर्षांची मुलगी आहे. लहानपणापासून गरिबीत जीवन जगत आली आहे. तिच्या कुटुंबियांकडे टीव्ही नाही आणि त्यांनी कधीच क्रिकेट सामना पाहिलेला नाही. इतकंच काय तर संपूर्ण गावात कोणाकडे टीव्ही नाही. त्यामुळे अवघ्या दहा वर्षात सचिनबाबत माहिती असणं तसं शक्य नाही. पण सुशीला मीणाने गोलंदाजीबाबत सांगितलं की, ‘एकदा का चेंडू हातात आला की मी फक्त फलंदाजाला बाद करण्याचा विचार करते.’

सचिन तेंडुलकरने पोस्ट केलेल्या व्हिडीओनंतर राजस्थान क्रिकेट असोसिएशनने सुशीला मीणाची दखल घेतली. तसेच तिला ट्रेनिंगसाठी हवी ती मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. नुकताच नेट प्रॅक्टिसमधील तिचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यात मंत्री राज्यवर्धन राठोर यांनी तिच्या भेदक गोलंदाजीचा सामना केला. यावेळी झालंही तसंच.. तिने यॉर्कर चेंडू टाकत राज्यवर्धन राठोर यांचा त्रिफळा उडवला. याला मंत्री राठोर यानीही दाद दिली. व्हिडीओ पोस्ट करत लिहिलं की, आपल्या मुलीच्या हातून बाद होत आपण सर्वच जिंकलो.