
वेस्ट इंडिजच्या निकोलस पूरनमध्ये एकहाती सामना फिरवण्याची क्षमता आहे. त्याच्या आक्रमक फलंदाजीची सगळ्यांनाच कल्पना आहे. जर, त्याचा दिवस असेल, तर तो काहीही करु शकतो. अशा फलंदाजाला तुम्ही छेडलत तर त्या गोलंदाजाची धुलाई होण स्वाभाविक आहे. अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या T20 वर्ल्ड कप 2024 च्या शेवटच्या ग्रुप मॅचमध्ये हेच दिसून आलं. ब्रँडन किंगच्या रुपाने वेस्ट इंडिजचा पहिला विकेट पडला. त्यानंतर पूरन फलंदाजीसाठी मैदानात उतरला. क्रीजवर आल्यानंतर नवीन-उल-हक पूरनला काहीतरी बोलला. पूरन लगेच त्यावर रिएक्ट झाला नाही. पण नवीन-उल-हकच्या बोलण्याची किंमत अजमतुल्लाह ओमरजईला चुकवावी लागली.
निकोलस पूरनने अजमतुल्लाह ओमरजईच्या एका ओव्हरमध्ये 36 धावा चोपल्या. वेस्ट इंडिजच्या इनिंगमधील ही चौथी ओव्हर होती. पूरनने ओमरजईच्या पहिल्या चेंडूवर सिक्स मारला. दुसरा चेंड़ू नो बॉल होता. पूरनने त्यावर चौकारासह 5 धावा वसूल केल्या. ओमरजईने त्यानंतर वाईड चेंडूवर 5 धावा दिल्या. त्यानंतर ओमरजईच्या यॉर्करवर एकही धाव निघाली नाही. त्यानंतर पुढच्या चार चेंडूवर पूरनने 2 सिक्स आणि 2 फोर मारत 20 धावा वसूल केल्या. अशा प्रकारे ओमरजईच्या एका ओव्हरमध्ये 36 रन्स वसूल केल्या.
4 ओव्हरमध्येच झाल्या इतक्या धावा
पूरनच्या या फटकेबाजीमुळे वेस्ट इंडिजच्या 4 ओव्हरमध्ये 73 धावा झाल्या. निकोलस पूरनच्या या बॅटिंगमुळे राशिद खानला गोलंदाजीत बदल करावे लागले. राशिद खानने स्वत: चेंडू हाती घेतला. त्याने सुद्धा पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा दिल्या.
पूरन-नवीन-उल-हक एकाच टीमकडून खेळतात
निकोलस पूरन आधीच आक्रमक खेळायच हे ठरवून आलेला की, नवीन-उल-हक बोलल्यानंतर त्याने त्याचं मन बदलल हे माहित नाही. पण मैदानावर जे दिसलं, त्यामुळे फॅन्सचे खूप एंटरटेनमेंट झालं. निकोलस पूरन आणि नवीन-उल-हक दोघे आयपीएलमध्ये LSG कडून खेळतात.
जय-पराजयचा सुपर-8 वर काय परिणाम?
वेस्ट इंडिज विरुद्ध अफगाणिस्तान सामन्याचा T20 वर्ल्ड कप 2024 च्या सुपर-8 फेरीवर काही परिणाम होणार नाहीय. कारण या दोन्ही टीम्स सुपर-8 मध्ये आधीच पोहोचल्या आहेत. पण इथे विजय मिळवून ग्रुप सी मध्ये टॉपवर राहण्याच समाधान मिळेल.