
टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात पाकिस्तानला तोंड लपवण्याची वेळ आली आहे. अमेरिकेला हलक्यात घेणं पाकिस्तानच्या अंगाशी आलं आहे. त्यामुळे भारताविरुद्धचा सामना गमावला तर स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येण्याची शक्यता आहे. तसेच इतर संघांच्या कामगिरीवर अवलंबून राहावं लागेल. टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील हायव्होल्टेज 19 वा सामना भारत पाकिस्तान यांच्यात होत आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात हे संघ आठव्यांदा आमनेसामने येणार आहेत. न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये हा सामना होणार आहे. याच मैदानावर भारताने आयर्लंडला पराभवाचं पाणी पाजलं आहे. तर पाकिस्तानचा संघ पहिल्यांदाच या मैदानावर खेळणार आहे. त्यामुळे या सामन्यात नाणेफेकीचा कौल महत्त्वाची भूमिका बजावेल.
भारत पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत एकूण सात टी20 सामने खेळले गेले आहेतत. भारताने 6 सामन्यात तर पाकिस्तानने एका सामन्यात विजय मिळवला आहे.पण मागच्या पाच सामन्यांचं गणित काढलं तर धावांचा पाठलाग करणारा संघ विजयी ठरला आहे. म्हणजेच टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाला पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. त्यामुळे नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी घेण्याचा दोन्ही संघांच्या कर्णधारांचा मानस असेल. भारताने आयर्लंडविरुद्धच्या सामन्यातही नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली होती. त्यामुळे नाणेफेक जिंकणाऱ्या संघ गोलंदाजी स्वीकारणार यात शंका नाही.
मागच्या टी20 वर्ल्डकप स्पर्धांमध्ये भारत पाकिस्तान सामन्याची आकडेवारी वाचली तर तुम्हाला विश्वास बसेल. 2012 मध्ये भारताने 8 विकेट सामना जिंकला होता. 2014 मध्ये भारताने 7 गडी राखून विजय मिळवला. 2016 मध्ये 6 गडी राखून विजय मिळवला. 2021 मध्ये पाकिस्तानने 10 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर 2022 मध्ये भारताने 4 गडी राखून पाकिस्तानला पराभवाचं पाणी पाजलं.
भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल, संजू सॅमसन, कुलदीप यादव , यशस्वी जयस्वाल.
पाकिस्तान संघ: मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), बाबर आझम (कर्णधार), उस्मान खान, फखर जमान, शादाब खान, आझम खान, इफ्तिखार अहमद, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, नसीम शाह, मोहम्मद अमीर, इमाद वसीम, अबरार अहमद, सैम अयुब , अब्बास आफ्रिदी