IND vs WI: टीम इंडिया अजिंक्य, विंडीजही सरस, इडन गार्डन्समध्ये टफ फाईट! पाहा आकडे

India vs West Indies Eden Gardens: दक्षिण आफ्रिकेनंतर ग्रुप 1 मधून सेमी फायनलमध्ये पोहचणारा दुसरा संघ कोणता असणार? याचं उत्तर 1 मार्चला मिळणार आहे. सेमी फायनलसाठी सुपर 8 फेरीतील सामन्यात भारत विरुद्ध विंडीज आमनेसामने असणार आहेत. विजेता संघ स्पर्धेत पुढे जाईल तर पराभूत संघाचं आव्हान संपुष्टात येईल.

IND vs WI: टीम इंडिया अजिंक्य, विंडीजही सरस, इडन गार्डन्समध्ये टफ फाईट! पाहा आकडे
India vs West Indies T20i Wc 2026 Kolkata
Image Credit source: PTI
| Updated on: Feb 28, 2026 | 10:05 AM

आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील साखळी फेरीत टीम इंडिया आणि वेस्ट इडिंजने जबरदस्त कामगिरी केली. दोन्ही संघांनी साखळी फेरीतील चारही सामने जिंकले. विंडीजने त्यानंतर सुपर 8 फेरीत विजयी सलामी देत सलग पाचवा सामना जिंकला. मात्र दक्षिण आफ्रिकेने सुपर 8 मधील दुसऱ्या सामन्यात विंडीजच्या विजयी एक्सप्रेसला ब्रेक लावला. तर त्याआधी दुसऱ्या बाजूला दक्षिण आफ्रिकेनेच टीम इंडियाला सुपर 8 मधील पहिल्या सामन्यात पराभूत केलं. मात्र टीम इंडियाने झिंबाब्वेवर मात करत सुपर 8 फेरीतील आव्हान कायम राखलं.

भारताच्या झिंबाब्वेवरील विजयानंतर दक्षिण आफ्रिकेचा सेमी फायनलमधील प्रवेश सुनिश्चित झाला. झिंबाब्वेचे सलग दुसऱ्या पराभवामुळे सुपर 8 फेरीतून पॅकअप झालं. त्यामुळे आता उपांत्य फेरीतील एका जागेसाठी टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात जोरदार चुरस आहे. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज दोन्ही संघ सुपर 8 फेरीतील आपला तिसरा अंतिम सामना एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत. हा सामना जिंकणारा संघ उपांत्य फेरीत पोहचेल. त्यामुळे या सामन्यात टफ फाईट पाहायला मिळणार आहे.

दोन्ही संघांची इडन गार्डन्समधील आकडेवारी

उभयसंघातील हा सामना कोलकातामधील ऐतिहासिक इडन गार्डन्समध्ये होणार आहे. दोन्ही संघ या मैदानात आतापर्यंत अजिंक्य आहेत. त्यामुळे या मैदानात पराभूत होणाऱ्या संघाचं वर्ल्ड कप स्पर्धेतील प्रवास संपेल. तर एक संघ पुढील फेरीत पोहचेल हे स्पष्ट आहे. त्यामुळे दोन्ही संघांकडून या सामन्यात कडवी झुंज पाहायला मिळणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध विंडीज यांच्यात या मैदानात एकूण 4 टी 20i सामने खेळवण्यात आले आहेत. भारताने या चारही सामन्यात विंडीजला पराभवाचं पाणी पाजलं आहे. त्यामुळे टीम इंडिया या मैदानात विंडीज विरुद्ध वरचढ असल्याचं स्पष्ट आहे. मात्र विंडीजही काही कमी नाही.

विंडीजने टी 20i क्रिकेटच्या इतिहासात या मैदानात खेळलेल्या तिन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. विंडीजने 3 पैकी 2 सामने या टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत जिंकले आहेत. तर विंडीज 2016 साली याच मैदानात इंग्लंडला पराभूत करत टी 20i वर्ल्ड चॅम्पियन ठरली होती.

दोन्ही संघांचा पहिलाच सामना

तसेच या मैदानात भारत आणि विंडीज दोन्ही संघ टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेनिमित्ताने पहिल्यांदा आमनेसामने असणार आहेत. अशात आता टीम इंडिया सामना जिंकून सेमी फायनलमध्ये पोहचण्यात यशस्वी ठरणार की विंडीज या मैदानातील आपला दबदबा कायम राखत वर्ल्ड कप ट्रॉफीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकणार? हे निकालनंतरच स्पष्ट होईल.

Follow Us