
भारतीय क्रिकेट संघाला अवघ्या 24 तासांत दुसरा झटका लागला आहे. भारताच्या मॅचविनर खेळाडूला दुखापतीमुळे न्यूझीलंड विरूद्धच्या उर्वरित एकदिवसीय मालिकेतून बाहेर व्हावं लागलं आहे. भारताचा विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत याला रविवारी 11 जानेवारीला पहिल्या सामन्याच्या काही तासांआधी दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतून बाहेर व्हावं लागलं. त्यानंतर भारताने नववर्षातील आणि एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना 4 विकेट्सने जिंकला. भारताने यासह न्यूझीलंड विरूद्धच्या 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. त्यानंतर आता भारताला आणखी एक मोठा झटका लागलाय. ऑलराउंडर वॉशिंग्टन सुंदर दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर झाल्याची माहिती बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. त्याच्या जागी एकदिवसीय संघात युवा फलंदाजाचा पहिल्यांदाच भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या सामन्याचं आयोजन हे रविवारी 11 जानेवारीला बडोद्यातील बीसीए स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. वॉशिंग्टनला या सामन्यादरम्यान बॉलिंग करताना डाव्या बरगडीच्या खालच्या भागात तीव्र वेदना जाणवल्या. त्यामुळे सुंदरला मालिकेतून माघार घ्यावी लागली आहे. आता सुंदरवर आवश्यक तपासण्या केल्या जातील. तसेच त्यानंतर बीसीसीआयची वैद्यकीय टीम तज्ञांचा सल्ला घेईल, अशी माहिती बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रकातून दिली आहे.
वॉशिंग्टन सुंदरला झालेली दुखापत युवा फलंदाजाच्या पथ्यावर पडली आहे. बीसीसीआय निवड समितीने सुंदरच्या जागी एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघात युवा फलंदाज आयुष बडोनी याचा समावेश केला आहे. आयुष इंडिया ए टीमसाठी खेळला आहेत. तसेच आयुषने आयपीएलमध्ये अनेक संघांचं प्रतिनिधित्व केलं आहे. या 26 वर्षीय फलंदाजाने आयपीएलमध्ये 56 सामन्यांत 963 धावा केल्या आहेत.
सुंदर आऊट बडोनी इन
🚨 News 🚨
Washington Sundar ruled out of #INDvNZ ODI series; Ayush Badoni receives maiden call-up.
Details ▶️ https://t.co/ktIeMig1sr #TeamIndia | @IDFCFIRSTBank
— BCCI (@BCCI) January 12, 2026
दरम्यान त्याआधी रविवारी ऋषभ पंत याच्या जागी युवा विकेटकीपर फलंदाज ध्रुव जुरेल याचा भारतीय संघात समावेश करण्यात आला. ध्रुवने भारताचं कसोटी आणि टी 20i सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलंय. मात्र ध्रुवचं अद्याप एकदिवसीय पदार्पण झालेलं नाही.
न्यूझीलंड विरूद्धच्या उर्वरित एकदिवसीय मालिकेसाठी भारताचा सुधारित संघ : शुबमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, प्रसीद कृष्णा, कुलदीप यादव, नितीश कुमार रेड्डी, अर्शदीप सिंग, यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल (विकेटकीपर) आणि आयुष बडोनी.