
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेपासून दुखापतीमुळे बाहेर आहे. टीम इंडियाने वनडे वर्ल्ड कपनंतर अनेक मालिका खेळल्या.नुकताच टी 20 वर्ल्ड कपही जिंकला. मात्र मोहम्मद शमीला दुखापतीमुळे टीमपासून दूर रहावं लागलं. मोहम्मद शमीने वनडे वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेत टीम इंडियासाठी निर्णायक भूमिका बजावली होती. त्याच्या या कामगिरीसाठी शमीला अर्जून पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. शमी गेली अनेक महिने क्रिकेटपासून दूर आहे. त्यामुळे चाहत्यांना शमीच्या कमबॅकची प्रतिक्षा आहे. अशात शमीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
मोहम्मद शमीचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. शमी या व्हीडिओमध्ये नेट्समध्ये बॉलिंग करताना दिसत आहे. शमी पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनलनंतर नेट्समध्ये सराव करताना दिसला. त्यामुळे शमी श्रीलंका दौऱ्यातून टीम इंडियात कमबॅक करणार का? अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरु झाली आहे.
टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यात टी 20I आणि वनडे सीरिज खेळणार आहे. या दोन्ही मालिका 3-3 सामन्यांच्या असणार आहेत. टी 20 मालिकेला 27 जुलैपासून सुरुवात होणार आहे. तर त्यानंतर 2 ऑगस्टपासून एकदिवसीय मालिकेचा श्रीगणेशा होणार आहे. या दोन्ही मालिकेसाठी बीसीसीआय निवड समितीने टीम इंडियाची घोषणा केलेली नाही. त्यात आता मोहम्मद शमीचा नेट्समध्ये सराव करतानाचा व्हीडिओ समोर आला आहे. त्यामुळे शमी श्रीलंका दौऱ्यातून कमबॅक करणार का? अशी चर्चा आहे.
मोहम्मद शमीचा सरावाचा व्हीडिओ व्हायरल
दरम्यान मोहम्मद शमीने वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेतील खेळलेल्या 7 सामन्यात सर्वाधिक 24 विकेट्स घेतल्या होत्या. शमीने या कामगिरीसह टीम इंडियाला फायनलपर्यंत पोहचवण्यात मोठी भूमिका बजावली होती. त्यानंतर आता शमी 8 महिन्यांनी पुन्हा कमबॅक करतो का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.